कल्याण – कल्याण पूर्वेत एका कपड्याच्या दुकानात एक २२ वर्षाची तरूणी कामगार म्हणून काम करत होती. दुकान मालक म्हणून या तरूणीचा मोबाईल क्रमांक ५५ वर्षाच्या दुकान मालकाकडे होता. विविध कारणे करून हा दुकान मालक दुकानातील तरूणीला जवळीक साधण्यासाठी लघुसंदेश पाठवित होता. नंतर या तरूणीला दुकान मालकाने थेट अश्लिल लघुसंदेश पाठविण्यास सुरूवात केली. हा प्रकार तरूणीने कुटुंबीयांना सांगितला. शुक्रवारी या मुलीला दुकानदाराने अश्लिल लघुसंदेश पाठविताच तिने दुकानात येऊन दुकानदाराला चपलेने बदडले.
तरूणी दुकानदाराला मारहाण करत असल्याची दृश्यध्वनी चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. त्यावेळी हा प्रकार उघडकीला आला. ही ध्वनी चित्रफित पाहून कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या मारहाणीनंंतर मुलीची आई आणि परिसरातील तरूणांचा रूद्रावतार पाहून मुलीच्या आईच्या सांगण्यावरून दुकानदाराने दुकानाच्या मंचाच्या बाहेर येऊन तरूणीची पाया पडून माफी मागितली.
मिळालेली माहिती अशी, की कल्याण पूर्वेत सौभाग्य लेडिज नावाचे दुकान आहे. या दुकानात परिसरातील एक मुलगी कामगार म्हणून दुकानात ग्राहक सेवेसाठी नोकरी करत होती. दुकानदार या मुलीची दररोज बोलताना विविध कारणे पुढे करत छेडछाड करत होता. आपण या दुकानात कामाला आहोत, त्यामुळे तरूणी दुकान मालकाला काही उलट बोलू शकत नव्हती. दुकानदाराच्या या प्रकाराने तरूणी काही दिवसांपासून त्रस्त होती.
जवळीक साधण्याचा दुकानदाराचा प्रयत्न तरूणाच्या लक्षात आल्यापासून ती सावध होती. नंतर दुकानदाराने तरूणीला अश्लिल मेसेज पाठविण्यास सुरूवात केली. अशाप्रकारचे मेसेज न पाठविण्यासाठी तरूणीने सुरूवातीला दुकानदाराला सांगितले. पण तो ते ऐकण्यास तयार नव्हता. घडत असलेल्या प्रकाराने ती त्रस्त होती. तिने दुकानदाराचे वाढते अश्लिल मेसेज पाठविण्याचा प्रकार पाहून दुकानदाराला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
सुरूवातीला तरूणीने दुकानात आपल्याबाबत घडत असलेल्या प्रकारासंदर्भात कुटुंबीयांना माहिती दिली. दुकानात दुकानदाराकडून आपल्या मुलीबाबत घडत असलेला प्रकार ऐकून या मुलीचे कुटुंबीय हादरले. त्यांनी दुकानदाराला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. ही माहिती मनसेचे स्थानिक पदाधिकारी सुनील केदारे यांना देण्यात आली.
गुरूवारी दुपारी मुलगी आपल्या आईसह काम करत असलेल्या दुकानात दुकानदाराला अश्लिल मेसेज का पाठवितो म्हणून जाब विचारण्यास गेली. तरूणीने रूद्रावतार धारण करत दुकानदाराला प्रश्न करण्यास सुरूवात केली. त्यावेळी दुकानदार दुकानातील मंचाच्या आड लपून बसला. त्यावेळी तरूणीने रागाच्या भरात आपल्या पायातील चप्पल काढून दुकानदाराला चपलेने बदडले.
मुलीची आईने दुकानदाराला झापले. आपल्या मुलीची माफी मागावी म्हणून सुनावले. हा प्रकार वाढू नये म्हणून घाबरलेल्या दुकानदाराने अखेर दुकानाच्या बाहेर येऊन तरुणीची पाया पडून माफी मागितली. ही दृश्य ध्वनी चित्रफित पाहून नंतर कोळसेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या मारहाण प्रकरणाची सध्या कल्याण, डोंबिवलीत चर्चा सुरू आहे.