कल्याण : कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळीचा भाई गोकुळ झा मी आहे हे तुला माहिती नाही का. तुला माझे नाव माहिती नाही का, असे प्रश्न गोकुळ झा या भाईने दोन महिन्यापूर्वी आडिवली ढोकळीतील एका इमारतीच्या रखवालदाराला करून त्यांच्यावर धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. गोकुळचा हा प्रताप पोलिसांना कल्याण मधील मराठी तरूणीच्या मारहाण प्रकरणाचा तपास करताना पुढे आला आहे.
मराठी तरूणीच्या मारहाण प्रकरणात गोकुळची कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने पोलिसांनी त्याला शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात आणले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालीन कोठडी सुनावली. गोकुळची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात येणार होती. गोकुळ झाची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासताना त्याच्यावर विठ्ठलवाडी, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत होती. पोलिसांच्या तपासात गोकुळने १६ मे २०२५ रोजी मध्यरात्री अडिच वाजण्याच्या दरम्यान आडिवली ढोकळी भागात पिंट्या डेव्हिड (४०) या रखवालदारावर धारदार हत्याराने हल्ला केला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यात पिंट्या डेव्हिड यांनी दाखल केलेली तक्रार अशी, की ते आडिवली ढोकळी भागातील तिरूपती भवन सोसायटीत पाणी सोडण्याचे काम करतात. ते याच इमारतीच्या वाहनतळाच्या जागेत झोपतात. १६ मे रोजी मध्यरात्री पिंट्या डेव्हिड लघुशंकेसाठी उठले. त्यावेळी त्यांना रस्त्यावर दोन दुचाकीवर एकूण चार जण बसल्याचे दिसले. यावेळी एका तरूणाने (गोकुळ झा) पिंट्या यांना दूरवरून आपणास दादा इकडे ये अशी हाक मारली. आपण जवळ गेलो तेव्हा त्याने या परिसराचा भाई कोण आहे, असा प्रश्न केला.
पिंट्या यांनी मला माहिती नाही असे उत्तर दिले. त्यावेळी संतापलेल्या गोकुळ झाने मी या परिसराचा भाई असताना तु मला माहिती नाही असे उत्तर कसे देऊ शकतो, असे प्रश्न गोकुळने पिंट्या यांच्या बरोबर करून वाद घालून त्यांना मारहाण केली. गोकुळच्या तावडीतून पिंट्या डेव्हिड यांनी सुटका करून घेण्यासाठी तेथून पळ काढला. गोकुळने जवळील धारदार हत्याराने पिंट्या यांचा पाठलाग करत त्यांच्या पाठीवर वार केले. त्यानंतर गोकुळ आणि त्याचे साथीदार पळून गेले.
ही माहिती पिंट्या यांनी सोसायटी पदाधिकारी आणि आपल्या भावाला दिली. मध्यरात्रीच ते मानपाडा पोलीस ठाण्यात आले. शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार घेऊन आल्यानंतर पिंट्या यांनी गोकुळ झा विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेप्रमाणे गोकुळवर गुन्हा दाखल केला होता.
मराठी तरूणीच्या मारहाण प्रकरणात हा गुन्हा पोलिसांनी तपासासाठी बाहेर काढला आहे. शुक्रवारी गोकुळला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असली तरी मानपाडा पोलीस ठाण्यातील मारहाण गुन्हा प्रकरणात गोकुळला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. न्यायालयात नेताना गोकुळने पत्रकारांना बघून घेण्याची धमकी दिली. तसेच न्यायालयात जाताना पोलिसांनी दिलेला बुरखा घालण्यास नकार दिला.