scorecardresearch

डोंबिवली जवळील गोळवली रिजन्सी इस्टेट संकुलात दहा दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट

पाणी टंचाईमुळे दररोज सोसायटीकडून इमारतीला दोन टँकर दिले जातात. टँकरसाठी प्रति घर एक हजार मोजावे लागतात.

Golwali Regency Estate Complex
गोळवली रिजन्सी इस्टेट संकूल

डोंबिवली- येथील पूर्व भागातील गोळवली जवळील रिजन्सी इस्टेट गृहसंकुलात मागील दहा दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना, स्थानिक आ. प्रमोद पाटील यांनी पुढाकार घेऊनही संकुलातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने रहिवाशांनी येत्या दोन दिवसात एमआयडीसीवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा- ठाणे परिवहनच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर भर; ठाणे परिवहन उपक्रमाचा आज अर्थसंकल्प

रिजन्सी इस्टेट गृहसंकुलाचा पाणी पुरवठा नियमित दाबाने करण्यात यावा म्हणून रिजन्सी इस्टेट गृहसंकुलाचे पदाधिकारी चंद्रहास चौधरी यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांना गेल्या आठवड्यात पत्र दिले आहे. या पत्रावर कार्यवाही होत नसल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत. एमआयडीसी पुरेशा दाबाने पाणी पुरवठ्यासंदर्भात उदासीन असल्याने रहिवाशांनी एमआयडीसीवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
पाणी टंचाईमुळे रहिवाशांना दररोज खासगी टँकरमधील पाणी विकत घेऊन पाण्याची तहान भागवावी लागते. घरात कपडे, धुणी, स्वच्छतागृह वापरासाठी टँकरच्या पाण्याचा वापर केला जातो. पिण्याच्या पाण्यासाठी बाजारातून बाटला विकत आणावा लागतो. हा फुकटचा भुर्दंड पाणी टंचाईमुळे संकुलाला बसत आहे, असे रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा- डोंबिवलीत फूल विक्रेत्याला लुटणारे चोरटे त्रिमूर्तिनगर झोपडपट्टीतून अटक

रिजन्सी गृहसंकुलात ५२ इमारतींमध्ये १२०० सदनिका आहेत. यामध्ये सुमारे सहा हजार रहिवासी राहतात. १०० बंगले मालक आहेत. तीन ते चार गावांची संख्या एकत्र राहत असताना एमआयडीसी या भागाला पाणी पुरवठा करण्यात टंगळमंगळ का करते. नियमित कर भरणा करुनही, पाणी देयक भरणा करुनही हा त्रास का दिला जात आहे, असे प्रश्न रहिवासी करत आहेत. पाणी टंचाईमुळे दररोज सोसायटीकडून इमारतीला दोन टँकर दिले जातात. टँकरसाठी प्रति घर एक हजार मोजावे लागतात. घरात पुरेसे पाणी असावे म्हणून रहिवासी स्ववर्गणी काढून खासगी टँकर सोसायटी टाकीत आणून ओततात. १० हजार लिटरचा टँकर अठराशे रुपये, ३० हजार लिटरचा टँकर पाच हजार ४०० रुपयांना घ्यावा लागतो. एकूण ५२ इमारतींमध्ये दररोज टँकर येत असल्याने सोसायटीचा दररोजाच पाण्यासाठी खर्च सुमारे एक लाख २५ हजार रुपये होत आहे, अशी माहिती रहिवाशांनी दिली.
रिजन्सी संकुलाकडे वळणाऱ्या शिळफाटा रस्त्यावरील मोदी मिठाई दुकानापर्यंत पाण्याचा दाब पुरेसा आहे. पण संकुलाकडे येणाऱ्या वाहिन्यांमध्ये दाब नाही असे रहिवाशांच्या निदर्शनास आले आहे. यापूर्वी शिळफाटा रस्त्याच्या लगतच्या रिजन्सी संकुलाकडे येणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये काही समाजकंटकांनी गोणपाट, कचरा भरुन वाहिन्या जाम केल्या आहेत. त्यामुळे संकुलात पाणी येत नव्हते, असे रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा- डोंबिवलीत फूल विक्रेत्याला लुटणारे चोरटे त्रिमूर्तिनगर झोपडपट्टीतून अटक

टँकर समुहाचा फायदा व्हावा म्हणून अनेक वेळा असे प्रकार केले जातात. तोच प्रकार आता सुरू आहे का याची माहिती रहिवासी काढत आहेत. एका संकुलातून दररोज सव्वा लाख रुपये किमतीचे टँकरव्दारे पाणी खरेदी केले जात असेल तर टँकर समुहाचे उखळ पांढरे करण्यासाठी असे प्रकार केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा- कल्याण पूर्वेत बेकायदा बांधकामे भुईसपाट

एमआयड़ीसीकडून काही पाणी ठाणे शहराकडे वळविले आहे. त्याचा परिणाम असावा अशी उत्तरे अधिकारी देतात. अधिक माहितीसाठी डोंबिवली एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस. पी. आव्हाड यांना संपर्क साधला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 16:17 IST