अंबरनाथः आम्ही पोलीस आहोत, पुढे तपासणी सुरू आहे, तुमच्या गळ्यातील जी सोनसाखळी आहे ती  काढून रूमालात ठेवा असे सांगत दोन भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला ४५ हजारांना गंडा घातला आहे. अंबरनाथच्या नवरे पार्क परिसरात रस्त्यावर गुरूवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. दोनच दिवसांपूर्वी बदलापुरात सकाळी फेरफटका  मारण्यासाठी बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाची चोरट्यांनी सोनसाखळी लंपास केली होती. पुढे पोलिसांची तपासणी सुरू आहे, तुम्ही तुमच्या गळ्यातील दागिने काढून कपड्यात ठेवा. तसेच पुढे एक श्रीमंत माणून महिलांना पैसे वाटतो आहे.  त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी तुम्ही  गरीब दिसायला हवे, म्हणून तुम्ही तुमच्या गळ्यातले दागिने काढून पिशवीत टाका. अशा प्रकारच्या बतावण्या करत महिला आणि पुरूषांना लुटण्याच्या प्रकारांमध्ये गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे.

हेही वाचा >>> गडचिरोली : प्रियकराच्या मदतीने मुलीनेच केली आईची हत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोबतच दागिने घालून बाहेर फिरणाऱ्या महिला आणि पुरूषांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचे प्रकारही काही  नवीन नाहीत. दोनच दिवसांपूर्वी बदलापूर पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते मोहन राऊत चौक रस्त्यावर फेरफटका मारणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची ७० हजारांची सोनसाखळी ओढून नेल्याचा प्रकार समोर आला होता. त्यातच आता अंबरनाथमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला पोलीस असल्याचे सांगून दोन भामट्यांनी फसवले आहे. आम्ही पोलीस आहोत. पुढे  तपासणी सुरू असून तुमच्या गळ्यातील सोनसाखळी काढून ठेवा, असे सांगून भामट्यांनी दामोदरन गणेश मुदलियार यांना त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रूपये किमतीची दीड तोळ्याची सोनसाखळी काढून रूमालात ठेवायला सांगितले. नकळत ही सोनसाखळी लंपास करत त्यांची फसवणूक केली. अंबरनाथ पश्चिमेतील मोहन सबर्बिया कार्यालयाच्या पुढे उद्यानाशेजारच्या रस्त्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन पोलिसांकडून सातत्याने केले जाते आहे.