कल्याण – मुंबईतील विक्रोळी येथील एका महिला प्रवाशाची अडीच लाखाहून अधिक रूपये किमतीची सोन्याचे दागिने असलेली पिशवी रविवारी सकाळी बदलापूर लोकलमध्ये विसरली. ही महिला कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्यांना आपली सोन्याचे दागिने असलेली पिशवी लोकलमध्ये विसरलो आहोत हे लक्षात आले. या महिलेची विसरलेली पिशवी उल्हासनगर मधील एका महिलेने ताब्यात घेऊन ती बदलापूर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केली. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी विक्रोळीच्या महिलेची ही पिशवी त्यांना सोन्याच्या ऐवजासह परत केली.
कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिलेली माहिती, अशी विक्रोळी येथील गोदरेज हिल साईड काॅलनी भागातील रहिवासी देवयानी अमित कुलकर्णी रविवारी सकाळी कल्याण मधील आपल्या नातेवाईकांंकडे गणपती दर्शनासाठी येत होत्या. विक्रोळी रेल्वे स्थानकात देवयानी यांनी रविवारी सकाळी साडे नऊ वाजता बदलापूर लोकल पकडली. ही लोकल कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर सव्वा दहा वाजता आली. भुरट्या चोरांच्या भीतीमुळे देवयानी यांनी गळ्यात सोने घालून जाण्यापेक्षा सोने पिशवीत ठेऊन ते कल्याणमध्ये पाहुण्यांच्या घरी गेल्यावर घालू असा विचार केला होता.
देवयानी घाई गडबडीत लोकलमधून उतरल्या. उतरल्यानंतर त्यांना आपली ८० ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली सोन्याची पिशवी आपण लोकलमध्येच विसरलो असल्याचे लक्षात आले. देवयानी यांनी तात्काळ बदलापूर लोकल पाठोपाठची लोकल पकडली आणि बदलापूर येथे जाऊन त्या लोकलमध्ये आपली सोन्याचे दागिने असलेली पिशवी आहे का हे तपासले. तेथे पिशवी आढळून आली नाही.
याप्रकरणी देवयानी कुलकर्णी यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ निरीक्षक कांदे यांच्या आदेशावरून रेल्वे महिला साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धुर्वे, म्हसणे, कांबळे, उमाळे सुसर यांचे पथक लोकलमध्ये हरवलेली पिशवी शोधण्याचे काम बदलापूर रेल्वे स्थानक भागात करत होते. कांदे यांच्या आदेशावरून गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, हवालदार माने यांनी बदलापूर येथे जाऊन बदलापूर लोकल रेल्वे स्थानकात येऊन गेल्यानंतरचे सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्या दिशेने तपास सुरू केला होता.
रेल्वे पोलीस पथके बदलापूर लोकलमध्ये हरविलेली देवयानी कुलकर्णी यांची सोन्याचा ऐवज असलेली पिशवी शोधत होते. दरम्यानच्या काळात उल्हासनगर कॅम्प पाच मधील सम्राट काॅलनी नेहरूनगर भागात राहणाऱ्या विजया देवराम कदम या महिला बदलापूर रेल्वे स्थानकातील पोलीस चौकीत आल्या. त्यांनी आपणास बदलापूर लोकलमध्ये एका अज्ञात महिलेची विसरलेली पिशवी सापडली आहे, असे सांगून ती पिशवी बदलापूर रेल्वे स्थानकातील महिला साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धुर्वे यांच्या स्वाधीन केली.
धुर्वे यांनी तात्काळ ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांदे यांना दिली. त्यानंतर देवयानी कुलकर्णी यांना लोहमार्ग पोलीस ठाण्यात बोलावून देवयानी यांची सोन्याचा ऐवज असलेली पिशवी त्यांच्या स्वाधीन करण्यात आली. पिशवीतील सोन्याचा ऐवज सुस्थितीत होता. देवयानी रेल्वे पोलिसांच्या या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले.