जिल्हा परिषद निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ उस्मानाबाद जिल्ह्य़ातील येणेगूरमध्ये मोठय़ा ‘थाटामाटात’ शनिवारी झाला. पाचशे-सातशे नेते आणि कार्यकर्ते जमणार, असे म्हटल्यावर नांदेडच्या कंत्राटदारांना भोजनाचे कंत्राट देण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी आयकर छापा पडलेल्या या कंत्राटदाराने काँग्रेसच्या नेत्यांसाठी खास सोनेरी मुलामा दिलेली ताटे लांबून आणली होती. नांदेड ते येणेगूर हे अंतर अंदाजे २०० किलोमीटरचे.
काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर, आमदार दिलीपराव देशमुख, आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील मुरुमकर, अशी मोठय़ा नेत्यांची मांदियाळी. लातूर जिल्ह्य़ातील औसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार बसवराज पाटील मूळचे उमरगा तालुक्यातले. तसे ते चाकूरकरांच्या जवळचे. त्यामुळे राज्याच्या प्रचाराच्या शुभारंभाला चाकूरकरांची हजेरी विशेष महत्त्वाची. एवढा मोठा कार्यक्रम म्हटल्यावर नेत्यांचे भोजन चांगलेच असले पाहिजे, असा येणेगूरच्या कार्यकर्त्यांचा अट्टाहास. त्याने नांदेड येथील भोजनाचे कंत्राट दिले. सोनेरी मुलामा दिलेल्या ताटात नेत्यांची जेवणे झाली आणि दुपारी १२.३० वाजता होणारी सभा ४ वाजता भोजनोत्तर सुरू झाली.
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी, सेना, भाजपच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, सेना आणि भाजपामध्ये सध्या नुराकुस्तीचा खेळ सुरू आहे. मागील दोन वर्षांत सरकारने केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्याची वेळ आली आहे. नोटाबंदीनंतर सामान्य नागरिकांच्या वाटय़ाला आलेल्या हालअपेष्टांचा विसर पडू देऊ नका.
माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी, मागील सात दशकात काँग्रेसमुळे देशात निर्माण झालेल्या अनेक सोयीसुविधांची माहिती उपस्थितांसमोर मांडली. तर काँग्रेस अडचणीत सापडल्यावर इथल्या सामान्य नागरिकांनी पक्षाच्या पाठीशी नेहमी आपले बळ उभे केले आहे. यावेळीही त्याची प्रचिती नक्की येईल. असा आशावाद सुशीलकुमार िशदे यांनी व्यक्त केला.