डोंबिवली – जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील फडके रस्त्यावर रविवारी पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे आयोजित बुक स्ट्रीटला वाचकप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डोंबिवलीत प्रथमच नदी सारखी रस्त्यावर मांडण्यात आलेली पुस्तके पाहण्यासाठी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक पहाटेपासून उपस्थित होते. बदलापूर, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरातील दर्दी वाचक या उपक्रमात सहभागी झाले होते.

शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे पालकांबरोबर मुलांची उपस्थिती लक्षणीय होती. सुमारे पाच ते सहा हजार नागरकांनी बुक स्ट्रीटवरील पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घेतला. मदन ठाकरे चौक ते अप्पा दातार चौक या २०० मीटरच्या रस्त्यावर सुमारे एक लाखाहून विविध प्रकारची पुस्तके आखीव रेखीव पद्धतीने मांडण्यात आली होती. वाचकप्रेमींना प्रत्येक पुस्तक पाहता, हाताळता यावे अशा पद्धतीच्या पायवाटा पुस्तक प्रदर्शनात करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा – विकासकामांमुळे काहींना पोटदुखी; मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका

शनिवारी रात्रीपासून फडके रस्त्यावर बुक स्ट्रीट उपक्रमासाठी रस्ता झाडून काढण्यापासून ते सतरंज्या मांडण्याची लगबग सुरू झाली होती. पै फ्रेन्ड्स लायब्ररीचे कर्मचारी, विविध संस्थांचे २०० स्वयंसेवक शनिवारच्या मध्यरात्रीपासून ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत दीड लाख पुस्तकांची मांडणी करत होते. यावेळी लहान मुलेही पालकांसमवेत आवर्जून उपस्थित होती. बुक स्ट्रीटमुळे फडके रस्त्यावरील गणेश मंदिराकडे जाणारी वाहने इतर रस्त्याने वळविण्यात आली होती.

बुक स्ट्रीटमध्ये आपला पहिला क्रमांक लागावा म्हणून वाचकप्रेमी नागरिक पहाटे चार वाजल्यापासून फडके रस्त्यावर हजर होते. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे एक हजाराहून अधिक नागरिकांनी बुक स्ट्रीटमधील सहभागासाठी नोंदणी केली होती. बदलापूर, कल्याण, ठाणे शहरापासून नागरिक या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कडक उन्हामुळे हा कार्यक्रम पहाटे साडेचार ते सकाळी १० या पाच तासांचा ठेवण्यात आला होता.

पुस्तक मांडणी पहाटे पूर्ण झाल्यानंतर उपस्थित नागरिकांना कुपन देऊन बुक स्ट्रीटमध्ये सोडण्यात आले. नऊ वाजेपर्यंत पाच हजारांहून अधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मदन ठाकरे चौकापासून ते ब्राह्मण सभा, सर्वेश सभागृह, टिळकनगर स्टेट बँकेपर्यंत नागरिकांची रांग लागली होती. पुस्तक प्रदर्शन ठिकाणी गर्दी नको म्हणून टप्प्याने वाचकांचे जथ्थे बुक स्ट्रीटवर सोडले जात होते.
डोंबिवली साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पै फ्रेन्ड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांच्या उपस्थितीत बुक स्ट्रीटचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमात सहभागी प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीचे पुस्तक भेट दिले जात होते.

विदेशी संकल्पना

विदेशात अनेक शहरांमध्ये काही भागात एक दिवस पुस्तकांसाठी उपक्रम आयोजित केला जातो. स्पॅनिश पुस्तक प्रेमी लुझ इंटरप्युटस यांची ही संकल्पना. एक दिवस रस्त्यावरील वाहनांचा गोंगाट, प्रदूषण, गर्दी कमी करून त्याऐवजी तो दिवस साहित्यिक, वैचारिक देवाण घेवाण, पुस्तक अदान प्रदान, शांतता यासाठी राखीव असावा. या उद्देशातून लुझ यांनी रस्त्यावर पुस्तके मांडून ती वाचकांना भेट देण्याचा, यानिमित्ताने साहित्यिक मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. लोकांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी हाही उपक्रमामागील उद्देश. या उपक्रमाच्या निमित्ताने एक दिवस रस्तोरस्ती पुस्तके मांडली जातात. लोक उत्स्फूर्तपणे ती पाहतात, घेतात. एक पुस्तक भव्य मेळावा यानिमित्ताने रंगतो. या विचारातून डोंबिवलीत प्रथमच बुक स्ट्रीटचे पुंडलिक पै यांनी आयोजन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा – ठाणे: मोठमोठय़ा इमारती उभारणे म्हणजे विकास नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांची स्पष्टोक्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“चौकटबद्ध जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यापेक्षा प्रत्यक्ष वाचकांचा सहभाग असलेला कार्यक्रम करावा. या उद्देशातून विदेशातील संकल्पनेप्रमाणे बुक स्ट्रीटचे आयोजन केले. त्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. असे उपक्रम नियमित केले तर नक्कीच वाचन संस्कृतीची मोठी चळवळ उभी राहील.” असे बुक स्ट्रीट, संजोयक, संचालक, पुंडलिक पै म्हणाले.