महापालिकेच्या कल्याण मुख्यालयाजवळ असलेल्या महापालिकेच्या शाळेला गेल्या आठवडय़ात एका विकासकाने बेकायदा पत्रे ठोकले होते. शाळेची जागा हडप करून तेथे इमारत उभारणीचा डाव रचल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. ८० वर्षे जुनी असलेली महापालिकेची ही शाळा दिवसाढवळ्या विकासकाच्या घशात चालल्याने कल्याणमधील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करताच महापालिकेने हे पत्रे हटविले आहेत.
या शाळेभोवती विकासकाने ठोकलेले पत्रे काढून टाका, अशी मागणी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी लावून धरली होती. या प्रकरणातील दोषी शिक्षण मंडळ अधिकारी सुरेश आवारी तसेच ही इमारत धोकादायक जाहीर करणारे कार्यकारी अभियंता यांची चौकशी करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभेत केली.
नगरसेवक अरविंद पोटे यांनी सभागृहात गुजराथी शाळेच्या विषय उपस्थित केला. पालिका मुख्यालयाजवळ असलेली शाळा एका विकासकाने हडप करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याकडे पालिकेतील आयुक्तांसह एकाही अधिकाऱ्याचे लक्ष नाही या विषयी उद्वेग व्यक्त केला. शिक्षण मंडळ अधिकारी सुरेश आवारी, उपायुक्त डॉ. सुनील लहाने यांनाही या विषयी कोणतीही माहिती नसल्याबद्दल पोटे यांनी आश्चर्य व्यक्त केले.
विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी, या शाळेला विकासकाने ठोकलेले पत्रे आणि जागा हडप करण्यासाठी चाललेला प्रयत्न याबाबत आयुक्तांना पत्र देऊन आठवडा झाला तरी प्रशासन संबंधित विकासकावर एमआरटीपी, फौजदारी गुन्हा का दाखल करीत नाही, असा सवाल उपस्थित केला. मुख्यालयाजवळची जागा हडप करण्याची विकासक हिंमत करीत असेल तर पालिकेच्या इतर पडीक जागा हडप करण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला दिला.

आमदारांचा दबाव
डोंबिवलीच्या आमदाराने शाळेभोवती विकासकाने लावलेल्या पत्र्यांवर कारवाई करू नका यासाठी दबाव आणल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी यावेळी केला. मंदार हळबे यांनी असे आरोप करण्यापेक्षा ते पुरावेच पटलावर ठेवा, असे आव्हान बोरगावकर यांना दिले. उपमहापौर राहुल दामले यांनी, आरोप करण्यापेक्षा बोरगावकर यांनी प्रत्यक्ष पुरावे समोर ठेवून बोलावे, असे सांगितले. महापौर कल्याणी पाटील यांनी या बांधकामावर कारवाई करण्यासाठी कोणाचाही राजकीय दबाव आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी आपणास सांगितले आहे, असे स्पष्ट केले.