कल्याण – दोन दिवसापूर्वी भिवंडी माणकोली उड्डाण पूल हद्दीत नारपोली पोलिसांनी ८४ लाखाचा गांजा तस्करांकडून पकडण्याची घटना ताजी असतानाच, कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजता कल्याण पश्चिमेतील कल्याण पडघा रस्त्यावरील गांधारे पुलावरून गुजरातमधून तस्करीने आणलेला ८७ लाख ३७ हजार रूपयांचा गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखुजन्य साठा जप्त केला आहे.

या तस्करी प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी राजस्थान मधील रहिवासी असलेल्या धनराज रामगोपाल स्वामी याला अटक केली आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर त्याच्या तस्कर साथीदारांंवर गुन्हा दाखल केला आहे. स्वामी हा राजस्थान राज्यातील लक्ष्मणगढ तालुक्यातील लालासी गावचा रहिवासी आहे. एका आयशर टेम्पोमधून स्वामी गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखुजन्न वस्तू घेऊन गुजरातमधून कल्याणमध्ये येत होता.

गुजरात राज्यातून गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखुजन्य वस्तू घेऊन एक आयशर टेम्पो कल्याण शहराच्या दिशेने निघाला आहे, अशी गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना मिळाली होती. हा टेम्पो महामार्ग सोडून पोलिसांना चकवा देण्यासाठी अंतर्गत रस्त्यांवरून धावत असल्याची माहिती पोलिसांना होती. हा टेम्पो पडघा येथून गांधारे पूल मार्गे कल्याण शहरात येण्याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणमधील गांधारे पूल येथे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून सापळा लावला होता.

शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या दरम्यान गांधारे पूल भागातून एक आयशर टेम्पो धावत होता. पोलिसांनी त्यांना रोखले पण तो पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर त्याला रोखले. आपण पोलीस जाळ्यात अडकलो याची जाणीव टेम्पोचा धनराज स्वामी याला झाली. पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली. त्यात प्रतिबंधित गुटखा, तंबाखुजन्य पदार्थाचा ८४ लाखाचा साठा होता.

पोलिसांनी चालक स्वामीची चौकशी केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चालक स्वामीसह इतर साथीदारांवर अन्न औषध प्रशासक मानक कायद्याने खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुजरातमधून हा गुटखा कोठून भरला. त्यांचा मुख्य म्होरक्या कोण आहे. कल्याण परिसरात कोणाला हा गुटखा, तंबाखुजन्य पदार्थांची विक्री केली जाणार होती. यापूर्वी अशाप्रकारे या टेम्पोच्या माध्यमातून किती वेळा तस्करी करण्यात आली आहे याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील यांनी सुरू केला आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, साहाय्यक आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, उपनिरीक्षक विनोद पाटील, किरण भिसे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, बोरकर, हवालदार सुधीर कदम, गुरूनाथ जरग, विलास कडू, विजय जिरे, प्रशांत वानखेडे, गोरक्षनाथ पोटे, सचिन भालेराव, पांडुरंग भांगरे, उल्हास खंदारे, सचिन कदम, मिथुन राठोड, दीपक महाजन, सतीश सोनवणे, विनोद चन्ने, गणेश हरणे, गोरक्ष शेकडे, आदिक जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.