ठाणे : ठाणे महापालिकेच्या तत्त्कालीन साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला करून चाकूने त्यांची बोटे छाटली होती. या खटल्याची सुनावणी ठाणे न्यायालयात झाली असून या हल्ल्याप्रकरणी फेरीवाला अमजितसिंह यादव याला न्यायालयाने दोषी ठरवत त्यास सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

ठाणे महापालिकेच्या माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमध्ये कल्पिता पिंपळे या साहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. ऑगस्ट २०२१ मध्ये त्या पथकासह घोडबंदर येथील कासारवडवली भागात फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यास गेल्या होत्या. त्याचवेळी भाजीविक्रेता फेरीवाला अमरजितसिंह यादव याने कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला इतका गंभीर होता की, पिंपळे यांची बोटे तुटून खाली पडली होती. या घटनेनंतर फेरीवाल्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.

साहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याप्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. तसेच, याप्रकरणी ॲड. शिशिर हिरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या खटल्यात २१ साक्षीदार तपासण्यात आले. हल्लेखोर फेरीवाल्याचा हेतू जीवघेण्याचा होता हे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. तसेच हल्ला संपल्यानंतरही हल्लेखोर दमदाटी करत होता असेही सरकारी वकिलांनी न्यायालयास सांगितले. या सर्व बाबी ग्राह्य धरून न्यायाधीश ए.एस. भागवत यांनी अमरजितसिंह याला दोषी ठरवत त्यास सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली अशी माहिती ॲड. शिशिर हिरे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.