कल्याण रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा विळखा; प्रवाशांची नाराजी
कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक भागातून फेरीवाल्यांना कायमस्वरूपी हटविण्यासाठी महापालिकेने फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या अन्यत्र बदल्या केल्या. काही पथकप्रमुखांना अन्य प्रभागात बदली केले. ही सगळी अदलाबदल करूनही रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले अजिबात हटत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याउलट फेरीवाल्यांच्या संख्येत दुपट्टीने वाढ झाली आहे.
नव्याने दाखल झालेल्या फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यांशी जुळवून घेऊन आपली नवी ‘दुकाने’ रेल्वे स्थानकात थाटली आहेत. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात हे दृश्य दिसत आहे. स्कायवॉकवर यापूर्वी फेरीवाले नुसते व्यवसाय करीत होते. आता ते आपल्या सामानाचा सगळा साठा घेऊन वस्तू विक्रीला बसत आहेत. त्यामुळे स्कायवॉकवरून चालणेही अवघड होत आहे. फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी गाडीत बसून रेल्वे स्थानक भागातून आपला ‘रथ’ फिरवत आहेत. महापालिकेची फेरीवाला हटाव पथकाची गाडी आली की तेवढय़ा वेळेपुरते फेरीवाले लपून बसत आहेत. गाडी गेली की पुन्हा फेरीवाले रस्त्यावर येऊन व्यवसाय करीत आहेत.
कल्याणप्रमाणेच डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भाग फेरीवाल्यांचा अड्डा बनला आहे. बाजीप्रभू चौक, चिमणीगल्ली, उर्सेकरवाडी, राजाजी रस्ता, नेहरू रस्ता, मानपाडा रस्ता फेरीवाल्यांनी गजबजून गेलेला असतो. या भागात सीमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा नाही. तरीही फेरीवाले रस्ते अडवून व्यवसाय करीत आहेत. या फेरीवाल्यांकडून महापालिका कर्मचारी दौलतजादा करीत असल्याच्या तक्रारी आहेत. रामनगर प्रभागाचे नगरसेवक मंदार हळबे यांनी महापालिका आयुक्तांना अनेक वेळा पत्रे देऊन फेरीवाला हटाव पथकातील स्थानिक कर्मचारी बदलण्याची मागणी केली आहे. परंतु, नगरसेवकाच्या पत्रालाही प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात येत आहे. पश्चिमेतील गुप्ते रस्ता, फुले चौक, दिनदयाळ चौक फेरीवाल्यांच्या विळख्यात आहेत.
नेहरू रस्त्यावर पाणीपुरी विक्रेत्यांच्या गाडय़ा रस्त्याच्या दुतर्फा लागत आहेत. पादचाऱ्यांना चालणे अवघड होत आहे. या भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक संध्याकाळच्या वेळेत या भागात काठी टेकत येतात. त्यांना या फेरीवाल्यांचा सर्वाधिक उपद्रव होत आहे.
डोंबिवलीतील फेरीवाला हटाव पथकातील पथक प्रमुख रमाकांत जोशी, संजय कुमावत, विजय भोईर यांच्या टिटवाळा, कल्याणमधील प्रभागांमध्ये बदली करावी आणि कल्याणमधील फेरीवाला हटावमधील पथक प्रमुख डोंबिवलीत नियुक्त करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापौरांचे मौन
महापौर राजेंद्र देवळेकर यापूर्वी नेहमी महापालिका सभागृहात फेरीवाल्यांचा विषय उपस्थित झाला की दर आठवडय़ाने सातही प्रभागांमधील फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी गोलाकार पद्धतीने बदलण्याची मागणी करीत असत. ही मागणी करणारे देवळेकर आता दस्तुरखुद्द महापौर आहेत. तेही फेरीवाल्यांच्या विषयावर सध्या गप्प झाल्याने सामान्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. देवळेकर यांनी पुढाकार घेऊन फेरीवाला हटाव पथकाचे पथकप्रमुख आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पुढाकार घ्यावा आणि रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hawkers encroach kalyan station
First published on: 06-05-2016 at 04:00 IST