kalyan dombivli municipal corporation ward structure update कल्याण डोंबिवली पालिकेच्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने १२२ प्रभागांची प्रारूप भौगोलिक सीमा रचना जाहीर केली आहे. या प्रभाग रचनेवर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील २६४ नागरिकांनी हरकती आणि सूचना पालिकेकडे दाखल केल्या आहेत, अशी माहिती पलिका निवडणूक विभागाचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी दिली.
पालिकेची १२२ प्रभागांची प्रारूप यादी प्रसिध्द होताच नागरिकांना २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना घेण्यासाठी अवधी देण्यात आला होता. या कालावधीत नागरिकांनी २६४ हरकती आणि सूचना दाखल केल्या आहेत.
नागरिकांनी दाखल केलेल्या हरकती आणि सूचनांवर राज्य शासनाकडून प्राधिकृत केलेले उद्योग संचलनालयाचे विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह ११ सप्टेंबर रोजी कल्याण डोंंबिवली पालिकेच्या स्थायी समिती सभागृहात नागरिकांच्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेणार आहेत. ही सुनावणी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत सुरू राहणार आहे.
कल्याण डोंंबिवली पालिका हद्दीतील २७ गावांमधील नागरिकांनीही या प्रभाग रचनेवर तीव्र आक्षेप घेतले आहेत. ही प्रभाग रचना आम्हाला मान्य नाही आणि आम्हाला कल्याण डोंबिवली पालिकेत राहायचे नाही, अशी भूमिका घेत आम्ही चार हजार हरकती दाखल केल्या आहेत, असे सर्व पक्षीय ग्रामीण संघर्ष समितीचे सत्यवान म्हात्रे यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) डोंबिवली विभागाचे अध्यक्ष किशोर मगरे यांनीही या प्रारूप प्रभाग रचनेला हरकत घेतली आहे. कल्याण डोंबिवली शहराची लोकसंख्या वाढली आहे. २०११ च्या जणगणनेप्रमाणे ही प्रभाग रचना केल्यास पालिका हद्दीतील अनुसूचित जाती, जमातीच्या नागरिक, उमेदवारांना यामध्ये न्याय मिळणार नाही. त्यामुळे सन २०२५ च्या लोकसंख्येचा विचार करून नवीन प्रभाग रचना जाहीर करावी. अन्यथा रिपाई आठवले गट या प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान दिल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा अध्यक्ष किशोर मगरे यांनी दिला आहे.
पालिका हद्दीत अनुसूचित जाती, जमातीची लोकसंंख्या वाढली आहे. त्याचा विचार न करता जुन्या लोकसंख्येप्रमाणे ही प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यामुळे सुधारित प्रभाग रचना केल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत, असे रिपब्लिकन आठवले गटाचे मगरे यांनी सांगितले. नवीन प्रभाग रचना सत्ताधारी शिंदे शिवसेनेने आपल्या सोयीप्रमाणे केली असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. याविषयी उघडपणे कोणीही बोलण्यास तयार नाही.