ठाणे – दिवाळी सणाला अवघे दोन ते तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दिवाळी खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. परंतु, गुरुवारी सायंकाळी विजेच्या गडगडाटासह ठाणे शहरात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडल्याचे दिसून आले. तसेच या पावसामुळे विक्रेत्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दिवाळी निमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. कंदील, पणत्या, रांगोळी, कपडे, घर सजावटीच्या वस्तू, किल्ल्यांसाठी लागणारे मावळे अशा विविध वस्तू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापार्यांकडून देखील खरेदीवर मोठ्या सवलती देण्यात आल्या आहेत. अवघे दोन ते तीन दिवस दिवाळीला राहिले असल्यामुळे नागरिकांची दिवाळी साहित्य तसेच कपडे खरेदी करण्यासाठी लगबग सुरु आहे.
यंदाच्या रविवारी ठाणे शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या जांभळीनाका बाजारात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. ठाणे शहरातील गोखले रोड, नौपाडा, गावदेवी परिसर, राम मारुती रोड, जांभळी नाका या परिसरात सध्या दररोज संध्याकाळी नागरिकांची खरेदीसाठी येत असतात. तर, काहीजण कामावरून घरी परतताना खरेदी करत असतो.
तसेच दिवाळी निमित्त विविध भागातून अनेक फेरीवाले गावदेवी तसेच जांभळीनाका बाजारात दाखल झाले आहेत. या फेरीवाल्यांनी गुरुवारी देखील नेहमीप्रमाणे आपली दुकाने मांडली होती. ग्राहक देखील आनंदाने खरेदी करत होते. परंतू, अचानक गुरुवारी सायंकाळी विजेच्या गडगडाट होऊ लागला. सोसाट्याचा वारा सुटला आणि मुसळधार पावसाच्या धारा कोसळू लागल्या. या पावसामुळे विक्रेत्यांपासून ग्राहकांची सर्वांचीच तारांबळ उडाली. जो तो अडोसा शोधायला लागला.
रांगोळी, पणत्या, मावळे विक्री करणारे फेरीवाले यांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले. रांगोळी तसेच पणत्या पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे खराब झाल्या. तर, मावळे देखील पाण्यात भिजून त्यांचा रंग उडाला. तसेच फेरीवाल्या विक्रेत्यांचेही या पावसामुळे नुकसान झाले. या पावसामुळे ग्राहकांचा हिरमोड झालाच परंतू, विक्रेते तसेच व्यापार्यांनाही याचा चांगलाच फटका बसला.