बदलापूरः गेल्या आठवड्यात काही अंशी विश्रांती घेणाऱ्या पावसाने बुधवारपासून पुन्हा हजेरी लावण्यास सुरूवात केली. शुक्रवारी बदलापूर, अंबरनाथ शहरात आणि आसपासच्या परिसरात सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाची एखादी मोठी सर येत होती. मात्र त्यानंतर रिमझीम पाऊस सुरूच होता. मे महिन्यापासून कोसळणाऱ्या पावसामुळे ठाणे जिल्ह्याची तहाण भागवणाऱ्या बारवी धरणात ८१ टक्के पाणी साठा झाला आहे.
यंदाच्या वर्षात मे महिन्यापासून पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला पश्चिम विक्षोभामुळे राज्यात पाऊस कोसळला. तर त्यानतंर अवकाळी पाऊस आणि मोसमी पावसाचेही आगमन जरा लवकर झाले. त्यामुळे मे महिना यंदा घामांच्या धारांच्या ऐवजी पाऊसधारांमध्ये गेला. परिणामी जलस्त्रोतांमध्ये मे महिन्यातील बाष्पीभवनाऐवजी पाणी साठा होऊ लागला. बारवी धरणातही मे महिन्यात चांगला पाणीसाठा झाला होता. बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना, ग्रामीण भागांना आणि औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे बारवी धरणात समाधानकारक पाणीसाठा होण्यासाठी डोळे लागलेले असतात.
मे, जून महिन्यात दमदार पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्यातही सुरूवातीपासूनच पावसाने चांगली हजेरी लावली होती. मात्र जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली. या काळात जलस्त्रोतांमध्येही विशेष पाण्याची भर पडली नाही. मात्र जुलै महिन्याच्या या आठवड्यापासून पावसाने पुन्हा बरसण्यास सुरूवात केली आहे. बुधवार आणि गुरूवारी तुरळक पावसाच्या सरी आल्या. मात्र शुक्रवार सकाळपासूनच पावसाने आपला जोर दाखवण्यास सुरूवात केली. सकाळपासून अंबरनाथ, बदलापूर आणि आसपासच्या परिसरात संततधार पाऊस सुरू होता. अचानक एखादी मोठी सर येत होती. ती सर गेल्यानंतर पुन्हा रिमझीम पाऊस सुरूच होता. आकाशात ढगांची गर्दी आणि हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस चांगला पडणार असल्याचे बोलले जाते.
बारवी ८१ टक्क्यांवर
बारवी धरणात शुक्रवार २५ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत तब्बल ८१ टक्के पाणी साठा झाला होता. सध्याच्या घडीला ७२.६० मीटरपैकी ७०.३८ मीटर इतकी उंची धरणातील पाण्याने गाठली आहे. तर धरणात २७५.६५ घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षात २५ जुलै रोजी ६०.९९ टक्के इतका पाणी साठा होता. तर गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत यंदा बारवी धरणात चांगला पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्याची पाणी चिंता मिटली आहे. मात्र पाऊस यंदाच्या मोसमात कधी नव्हे ते पावसाने विक्रम केलेले आहेत.