धुक्यामुळे दृश्यमानतेत घट, तापमानात घटल्याने गारवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. मात्र हा जोर फार काळ टिकला नाही. अवकाळी पावसामुळे सकाळपासूनच तापमानाचा पारा बराच अंशी खाली आला होता. ठाणे शहरात दुपारी पावसामुळे धुकेसदृश वातावरण पाहायला मिळाले.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू झाला. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची यामुळे तारांबळ उडाली. जिल्ह्यात पहाटेपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. कल्याण-डोंबिवली शहरात दुपारनंतर पावसाने जोर धरला. यामुळे रस्त्यावर भाजी, फळ तसेच इतर वस्तू विक्रीसाठी घेऊन बसणाऱ्या विक्रेत्यांना दुकान गुंडाळून घरी जावे लागले. अंबरनाथ, बदलापूर शहरात सकाळी दहा वाजेपर्यंत तुरळक सरी पडत होत्या. दुपारनंतर येथेही पावसाने जोर धरला. सायंकाळी चारनंतर मात्र हा जोर कमी झाला. मंगळवारी दुपारपासूनच संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अंबरनाथ तालुक्यासोबतच मुरबाड आणि शहापूर तालुक्यातही बुधवारी दिवसभर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले. भिवंडी शहरातील काही भागात पावसाचा जोर वाढल्याने येथील रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सायंकाळच्या सुमारास गारवा अधिक वाढला.