Heavy vehicles banned on Ghodbunder Road ठाणे : गणेशमूर्ती विसर्जन कालावधीत अवजड वाहनांचा भार वाढून ठाणे शहर, घोडबंदर भागात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी घोडबंदर भागात अवजड वाहनांना गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवसांत २४ तास प्रवेशबंदी लागू केली आहे. २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर या दिवशी अवजड वाहनांना बंदी असेल असे ठाणे वाहतुक पोलिसांच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

उरण जेएनपीए बंदरातून ठाणे शहरातून हजारो अवजड वाहने भिवंडी, वसई आणि गुजरातच्या दिशेने वाहतुक करत असतात. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत प्रवेश करण्यास मुभा असून उर्वरित वेळेत प्रवेशबंदी आहे. ठाणे शहरातील अरुंद रस्ते, खड्डे आणि शासकीय प्रकल्पांच्या कामांमुळे दररोज ठाणेकरांना कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे. अवजड वाहनांमुळे कोंडीत भर पडते.

ठाण्यात मोठ्याप्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे गणेशमूर्ती विसर्जनासाठी मिरवणूकाही काढल्या जातात. घोडबंदर भागात खाडी किनारे, तलाव असल्याने अनेक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन तेथे होत असते. या मिरवणूकांदरम्यान अवजड वाहनांच्या घुसखोरीमुळे वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर विसर्जनाच्या दिवशी २४ तास बंदी लागू केली आहे. २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर या दिवशी अवजड वाहनांना ही बंदी असेल

घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी असल्याने येथील वाहतुक चिंचोटी नाका, भिवंडी, अंजुरफाटा, कामण रोड, भिवंडी अंजुरफाटा, मानकोली मार्गे वाहतुक करु शकतील. त्यामुळे या मार्गावर अवजड वाहनांचा भार वाढू शकतो.