कल्याण – अनेक वर्षांची परंपरा असलेला ऐतिहासिक कल्याण शहरातील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवी नवरात्रोत्सव सोमवार (ता.२२) पासून सुरू होत आहे. दहा दिवस चालणाऱ्या (ता.२) या नवरात्रोत्सवामुळे दुर्गाडी किल्ला परिसरातील रस्ते आणि कल्याण शहर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने कल्याण शहरात सोमवारपासून संध्याकाळी चार ते रात्री १२ या वेळेत जड, अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हलक्या वाहनांची वाहतूक शहरातून सुरू राहणार आहे. सोमवारपासून या निर्णयाची कठोर अंमलबजावणी सुरू होईल. जड, अवजड वाहन चालकांनी पर्यायी रस्ते मार्गाने इच्छित स्थळी जावे, असे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचनेच्या माध्यमातून जाहीर केले आहे.

प्रवेश बंद आणि पर्यायी मार्ग

नवी मुंबई, पनवेल, अलिबाग, पुणे भागातून कल्याण शहरात येणाऱ्या सहा चाकी जड, अवजड वाहनांना मुंब्रा वाहतूक हद्दीतील शिळफाटा दत्तमंदिर चौक (कल्याण फाटा) येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने मुंब्रा खारेगाव जुना टोलनाका, मुंबई नशिक महामार्गाने इच्छित स्थळी जातील. तळोजा खोणी बाह्यवळण रस्तामार्गे कल्याण शिळफाटा रस्त्याकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना काटई बदलापूर रस्त्यावरील खोणीतील निसर्ग ढाबा येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने काटई चौक, पलावा चौक, कल्याण फाटामार्गे इच्छित स्थळी जातील.

बदलापूर परिसरातून नेवाळी नाका मार्गे कल्याण शहरात येणाऱ्या जड वाहनांना नेवाळी नाका येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने बदलापूर, अंबरनाथ महामार्गाने इच्छित स्थळी जातील. उल्हासनगर भागातून श्रीराम चौकातून कल्याणकडे येणाऱ्या जड, अवजड वाहनांना श्रीराम चौकात प्रवेश बंद असेल. ही वाहने श्रीराम चौकातून उल्हासनगर, अंबरनाथ, शहाडमार्गे जातील.

मुरबाड, शहाड, उल्हासनगर भागातून कोनगाव भिवंडीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना आधारवाडी चौक येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने आधारवाडी चौकातून गांधारे पूल, बापगाव, पडघामार्गे इच्छित स्थळी जातील. ठाणे, भिवंडीकडून कल्याण शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना भिवंडी जवळील रांजनोली नाका येथे प्रवेश बंद असणार आहे. ही वाहने मुंबई नाशिक महामार्ग, खारेगाव, मुंब्रा येथून इच्छित स्थळी जातील. नाशिक, भिवंडी, पडघा, वाडा येथून कल्याणमध्ये येणाऱ्या जड, अवजड वाहनांना गांंधारी चौक येथे प्रवेश असेल. ही वाहने सावद नाका येथून सोनाळेमार्गे इच्छित स्थळी जातील, उपायुक्त पंकज शिरसाट यांनी जाहीर केले आहे.

यापूर्वी दुर्गाडी देवी नवरात्रोत्सवाच्या काळात वाहनांना आधारवाडी चौक, लालचौकी मार्गे शहरात प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत अवजड वाहने शहरात आली की शहर यापूर्वी वाहतूक कोंडीने गजबजून जात होते. दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी दहा दिवस जत्रा भरते. भाविक दर्शनासाठी येतात. त्यांची वाहने परिसरात रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. दुर्गाडी किल्ला गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्याने जाणारा येणारा रस्ता या कालावधीत कोंडीने गजबजून जातो. हा रस्ता दुचाकी, दुचाकी स्वारांसाठी खुला ठेवण्याची प्रवाशांची मागणी आहे.