Thane illegal construction ठाणे : मुंब्रा येथील शीळ भागातील खान कंपाऊंड परिसरात उभारण्यात आलेल्या २१ अनधिकृत इमारतींवर उच्च न्यायालयाच्या आदेशाने ठाणे महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता याच भागातील आणखी ११ इमारतींचे बांधकाम पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने पालिकेची पुन्हा नामुष्की ओढावली असून या ठिकाणी पालिकेने दोन इमारतींचे बांधकाम जमीनदोस्त केले आहे. उर्वरित इमारतीतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसा पालिकेने बजावल्या आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा येथील शीळ भागातील खान कंपाऊंड परिसरात १७ अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या होत्या. इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत पालिकेला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशामुळे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यावर स्वत: मुंब्रा येथील शीळ भागात जाऊन त्या इमारतींवर कारवाई करण्याची नामुष्की ओढवली होती. येथील १७ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या.
या कारवाईदरम्यान, येथील आणखी चार अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या. अशाप्रकारे या भागात एकूण २१ इमारतींचे बांधकाम पाडण्यात आलेला असतानाच, पालिकेने आता शिळ भागातील आणखी ११ इमारतींवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शनिवारपासून कारवाई सुरू केली असून त्यात दोन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
दोन इमारती पालिकेने पाडल्या
शीळ येथील ११ अनधिकृत इमारतींचे बांधकाम हे २०१८ ते २०१९ या काळात झाले आहे. याठिकाणी एकूण सात मजली सहा, आठ मजली एक, सहा मजली एक, चार मजली एक आणि तीन मजली एक अशा एकूण १० इमारती आहेत. या इमारतीत प्रत्येकी २१ ते ४७ खोल्या आहेत. यातील तीन मजली इमारत वगळता इतर नऊ इमारतीत एकूण ३२९ कुटूंबे राहत आहेत. त्यापैकी चार आणि तीन मजली इमारतीचे बांधकाम पालिकेने पाडले आहे. तर एका सात मजली इमारतीचे बांधकाम पाडण्याचे काम सुरू केले आहे. उर्वरित इमारतीमधील रहिवाशांना पालिकेने नोटीसा देऊन घरे रिकामे करण्यास सांगितले आहे. बिल्डर आणि जमीन मालक हे दोघे नातेवाईक असून त्यांच्यातील वादाचे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यावर सुनावणी देताना न्यायालयाने बांधकाम पाडण्याचे आदेश दिले.
शाळा केली रिकामी
१० इमारतींशेजारीच आणखी एक सात मजली अनधिकृत इमारत आहे. तीही उच्च न्यायालयाने तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याठिकाणी ४३ कुटूंंब राहत आहेत. याशिवाय, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शाळा होती. ती पालिकेने रिकामी केली असून या शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन करण्याची सुचना अतिक्रमण विभागाने शिक्षण विभागाला दिल्या आहेत.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शीळ येथील आणखी ११ इमारती तोडण्याचे नियोजन आखण्यात आले असून त्यापैकी दोन इमारती तोडण्यात आल्या आहेत. उर्वरित इमारतीमधील रहिवाशांना नोटीसा बजावून इमारत रिकामी करण्यास सांगितले आहे. इमारत रिकामी होताच येथे कारवाई केली जाणार आहे.- शंकर पाटोळे – उपायुक्त, अतिक्रमण विभाग, ठाणे महापालिका