हिरानंदानी इस्टेटमध्ये ५०० हून अधिक करोनाबाधित

किशोर कोकणे

ठाणे : ठाणे जिल्ह्यात सर्वत्र करोनाचा फैलाव वेगाने होत असला तरी, नववसाहती तसेच उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या गृहसंकुलांत रुग्णसंख्या अधिक असल्याचे आढळून येत आहे. ठाण्यातील प्रसिद्ध हिरानंदानी इस्टेट वसाहतीत सध्या ५०० हून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नववसाहतींमधील इमारती प्रतिबंधित केल्या जात नसल्या तरी प्रशासनाची डोकेदुखी मात्र यामुळे वाढली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दिवसाला सहा हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांमध्येही दाटीवाटीचा परिसर किंवा चाळीपेक्षा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये करोनाचे प्रमाण अधिक आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक रुग्णसंख्या ही माजिवडा मानपाडा समिती क्षेत्रात म्हणजेच, घोडबंदर भागातील आहे. या क्षेत्रात दररोज सुमारे ६०० ते ७०० करोना रुग्ण आढळून येतात. येथील हिरानंदानी इस्टेट हा भाग उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो. या भागात मंत्री, राजकीय नेते, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीही वास्तव्यास आहेत. अर्पण फाऊंडेशन या

संघटनेने तयार केलेल्या आकडेवारीनुसार, एकटय़ा हिरानंदानी इस्टेट भागात सध्या ५२९ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ५२५ करोनाबाधितांवर घरीच उपचार सुरू आहेत. तर १७५ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. येथील काही गृहसंकुलांतील पदाधिकारी करोनाबाबतची पुरेशी माहिती पुरवत नसतात. त्यामुळे आकडा हा आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. शहरातील कोलशेत, वसंतविहार, मानपाडा, मेडोज भागातही मोठी गृहसंकुले आहेत. या गृहसंकुलांमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे.  कल्याण येथील शिळफाटा येथेही मोठी गृहसंकुले आहेत. हजारो नागरिक या भागात राहत असून बहुतांश नागरिक मुंबई, नवी मुंबईत कामानिमित्ताने जात असतात. त्यामुळे या भागातही करोनाचा प्रसार वाढत असल्याचे कळते आहे. तर अंबरनाथमध्ये निसर्ग, पाले, मोहन या भागातही उद्योजक, व्यावसायिक, अधिकारी राहतात. या भागातही दिवसाला १५ ते २० करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.

  हिरानंदानी, ब्रम्हांड भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे येथील इमारतींमधील गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन करोना संदर्भाच्या उपाययोजना, ठाणे महापालिकेची नियमावली, चाचण्यांची माहिती आम्ही देण्यास सुरुवात केली आहे. येथील नागरिकांचे लसीकरणही सुरू आहे. तसेच कोणत्या इमारतीत किती रुग्ण आहेत. याची दररोजची माहिती आम्ही घेत आहोत. 

-मनोहर डुंबरे, नगरसेवक, हिरानंदानी इस्टेट. 

ठाणे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण हे इमारतींमध्ये अधिक आहे. करोनाची लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ चाचणी करून घ्यावी.  त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकेल. घराबाहेर पडताना मुखपट्टी वापर करावा. तसेच करोना नियमांचे पालन करावे.

– डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक.