डोंबिवली : ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील रहिवासी गोपाळ काबरा यांच्या घरात दागिन्यांची झालेली चोरी या घरात काम करणाऱ्या मोलकरणीनेच केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. ती त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीमध्ये राहते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकुर्लीतील मंगेशी डझल सोसायटीत राहणारे काबरा कुटुंबीय नोकरी करते. त्यांच्या घरातील लाकडी कपाटातील मंगळसूत्र, अंगठी, पैंजण असा ऐवज चोरीला गेला होता. काबरा यांच्या घराच्या दरवाजाजवळ असलेल्या चाव्यांच्या जुडग्यांपैकी एक जोड हरवला होता. घर परिसरात पडला असेल असा विचार करून काबरा यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. एक दिवस कपाट तपासताना घरातील दागिने चोरीला गेल्याचे दिसले. घराच्या दरवाजाची तोडफोड झाली नसताना अचानक दागिने गायब झाल्याने काबरा कुटुंबीय अस्वस्थ होते. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीलेश पाटील, नितीन मुदगुन, हवालदार दत्ताराम भोसले, अजित राजपूत, सतीश पगारे, संगीता इरपाचे, बंगारा यांनी घरफोडी गुन्ह्याचा तपास सुरू केला. या पथकाने घरकाम करणारी मोलकरीण ऊर्मिला जितेंद्र कदम (२६, रा. त्रिमूर्तीनगर झोपडपट्टी) हिला ताब्यात घेतले. तिने सराईत गुन्हेगाराप्रमाणे आपण चोरी केली नसल्याचे सांगितले. पोलिसांनी कसून चौकशी करताच ऊर्मिलाने काबरा यांच्या घरातील चावी चोरून त्याद्वारे दरवाजा उघडून चोरी केली असल्याची कबुली दिली. हे दागिने गोग्रासवाडीतील पूजा ज्वेलर्सच्या मालकाला ५० हजार रुपयांना विकल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Housemaid arrested for jewelry theft zws
First published on: 10-07-2019 at 04:24 IST