लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण – कल्याण रेल्वे स्थानका जवळील मालगाड्यांचा थांबा असलेल्या एका रेल्वे मार्गिकेवर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसचा एका डबा उभा होता. रविवारी संध्याकाळी या डब्यातून अचानक धूर येऊन आगीचा भडका उडाला. अग्निशमन दलाचे जवान, रेल्वे अधिकारी, सुरक्षा रक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणले.
आग लागलेला डबा मालगाड्यांचा थांबा असलेल्या भागात उभा होता. या डब्याच्या बाजुला मालवाहू मालगाड्या उभ्या होत्या. त्यामुळे या आगीची झळ बाजूला उभ्या असलेल्या मालगाड्यांना लागू नये म्हणून रेल्वे सुरक्षा जवान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घेतली. हा डबा रिकामा आणि डब्या जवळ कोणीही नसल्याने जीवित हानी झाली नाही.
आणखी वाचा-अवकाळी पावसामुळे शॉर्ट सर्किट होऊन भाईंदरमधील झोपडपट्टीत आग
रविवारी संध्याकाळी मालगाड्यांजवळील एका मार्गिकेवर उभ्या असलेल्या डब्यातून धूर येत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना मिळाली. ढगाळ वातावरण, वाऱ्याचा वेग असल्याने आगीने तात्काळ रौद्ररूप धारण करून संपूर्ण डबा आगीत खाक झाला. अग्निशमन जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण आणले.
मालगाडी यार्ड भागात काही गर्दुल्ले रात्रीच्या वेळेत बसतात. त्यांच्याकडून पेटती काडी डब्यात टाकली असावी. वाऱ्याच्या वेगाने त्या काडीने पेट घेऊन आग लागली असण्याचा प्राथमिक संशय रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. रेल्वे पोलिसांनी या आग प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.