Thane crime news : ठाणे : कळवा परिसरातील राज्य शासनाच्या जमिनीवर एका बांधकाम व्यावसायिकाने ३६ वर्षांपुर्वी तीन इमारती बांधून तेथील रहिवाशांची ४४ कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या इमारतींच्या पुनर्विकासाकरिता रहिवाशांनी जमीन नावावर करण्याची प्रक्रीया सुरू केली, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

या प्रकरणात ‘मे. अमृत बिल्डर्स’ या भागीदारी संस्थेचे पाच भागीदार दीपक रमेश मेहता, जयश्री रमेश मेहता, रमेश अमृतलाल मेहता, केतन रमेश मेहता आणि प्रिती रमेश मेहता यांच्याविरोधात कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. श्री अमृत पार्क सोसायटीमधील रहिवाशी अरविंद शिवराज पटवर्धन (वय ७४) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अरविंद यांच्यासह एकूण ११२ सदनिकाधारकांची सुमारे ४४ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे. हा तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पोलिस उपनिरिक्षक सृष्टी शिंदे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

‘मे. अमृत बिल्डर्स’ या भागीदारी संस्थेचे पाच भागीदार दीपक रमेश मेहता, जयश्री रमेश मेहता, रमेश अमृतलाल मेहता, केतन रमेश मेहता आणि प्रिती रमेश मेहता यांनी १९८९ मध्ये राज्य शासनाच्या ४३०० चौरस मीटर भुखंडावर तीन अनधिकृत इमारती बांधून त्यातील सदनिकांची विक्री केली. अमृत पार्क, श्री अमृत पार्क आणि ओम अमृत पार्क अशी तीन इमारतींची नावे आहेत. बनावट कागदपत्र तयार करून ते खरे असल्याचे भासवून त्याआधारे दस्त नोंदणीकृत करून सदनिकांची विक्री केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

आणि प्रकार उघडकीस आला

या तीन्ही इमारती जुन्या झाल्या असून त्यांचा पुनर्विकास करण्याची तयारी रहिवाशांनी सुरू केली होती. त्यासाठी इमारतीची जमीनी नावावर करण्यासाठी रहिवाशांनी पाठपुरावा सुरू केला होता. यासाठी जमीनीची मोजणी करण्यात आली. त्यावेळी त्या अहवालात ही जमीन शासनाची असल्याचे समोर आले. तब्बल ३६ वर्षानंतर इमारत अनधिकृत असल्याची बाब रहिवाशांच्या निदर्शनास आली असून या इमारतींच्या पुनर्विकासात अडथळे निर्माण झाल्याने रहिवाशी धास्तावले आहेत.