डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील मौजे नवागाव महसुली हद्दीतील गायकवाड वाडी भागात कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता एका बेकायदा बंगल्याची उभारणी करणाऱ्या दोन भूमाफिया भावांवर पालिकेच्या ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या पुढाकाराने अधीक्षक अर्जुन वाघमारे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात बेकायदा बंगला उभारल्याची तक्रार केली.
पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना आणि नियोजन अधिनियमाने (एमआरटीपी)चा गुन्हा बंगला उभारणाऱ्या दोन बंधूंवर दाखल केला आहे. गेल्या दहा दिवसांपासून डोंबिवली पश्चिमेत बेकायदा इमारती अनधिकृत घोषित करण्याची कार्यवाही आणि भुईसपाट करण्याच्या नोटिसा ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी बजावण्यास सुरूवात केल्याने भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
गेल्या दहा दिवसापूर्वी कुंभारखाणपाडा भागातील साई रेसिडेन्सी इमारत ह प्रभागाने अनधिकृत घोषित करून कारवाईची नोटीस बजावली आहे. ठाकुरवाडीतील साईतीर्थ या बेकायदा इमारतींच्या भूमाफियांवर पालिकेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला आहे. आता मौजे नवागाव हद्दीतील गायकवाड वाडीतील दोन बंधूंचा बेकायदा बंगला पालिकेच्या रडारवर आला आहे.
विष्णुनगर पोलीस ठाण्यात पालिकेने दाखल केलेली तक्रार अशी, की नितीन नामदेव गायकवाड आणि विश्वनाथ नामदेव गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता मौजे नवागाव महसुली हद्दीतील गायकवाड वाडी भागात सर्व्हे क्रमांक २३३-३ या जमिनीवर बेकायदा बंगल्याची उभारणी केली आहे.
हे दोन्ही भाऊ गायकवाड वाडीतील बजरंग कृपा इमारती समोरील रुक्मिणी निवास येथे राहतात. नितीन आणि विश्वनाथ नामदेव गायकवाड यांनी बेकायदा बंगल्याची उभारणी केल्याची तक्रार पालिकेच्या ह प्रभागात दाखल झाली. त्याप्रमाणे साहाय्यक आयुक्तांनी हा बंगला उभारणाऱ्या नितीन आणि विश्वनाथ गायकवाड यांना या बंगल्याची अधिकृतात सिध्दता करणारी कागदपत्रे दाखल करण्यासाठी आणि सुनावणीला हजर राहण्यासाठी नोटिसा बजावल्या.
पुरेसा अवधी देऊनही नितीन आणि विश्वनाथ गायकवाड हे भूमाफिया पालिकेच्या सुनावणीला हजर राहिले नाहीत किंवा त्यांनी बांधकामांची अधिकृत कागदपत्रे पालिकेत दाखल केली नाहीत. त्यामुळे साहाय्यक आयुक्तांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गायकवाड बंधूंचे बंगल्याचे बांधकाम अनधिकृत घोषित केले. आणि हे बांधकाम नोटीस दिल्यापासून १५ दिवसात भुईसपाट करण्याचे निर्देश दिले. या आदेशाप्रमाणे नितीन आणि विश्वनाथ गायकवाड यांनी बंगल्याचे बांधकाम स्वताहून तोडून घेतले नाही.
पालिकेच्या नोटिसीचे अनुपालन करण्यास कसूर केली. बेकायदा बांधकामांची उभारणी करून त्याची पाठराखण करण्यास पुढाकार घेतला म्हणून पालिका अधीक्षक वाघमारे यांनी नितीन आणि विश्वनाथ गायकवाड यांच्या विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या बंगल्यात रहिवास असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बेकायदा बांधकाम केले की त्यात तात्पुरता रहिवास दाखविला की पालिका, पोलिसांनी कारवाई करताना अडथळा येतो. त्यामुळे बहुतांशी सर्वच भूमाफियांनी उभारलेल्या बेकायदा इमारतींमध्ये रहिवास असल्याचे चित्र उभे केले आहे.