टिटवाळा, खडवली परिसरात भूमाफियांनी सरकारी, वन तसेच खासगी भूखंडांवर बेकायदे बांधकामे उभारण्याचा सपाटा लावला आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, महापालिका प्रशासन यांच्या परवानग्या न घेता उभारण्यात आलेल्या या बांधकामांच्या जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन टिटवाळ्याजवळील घोटसई गावातील सरकारी जमिनीवर उभारण्यात आलेल्या बेकायदा चाळी, गोदामांची बांधकामे कल्याण तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आली.
घोटसई गावाच्या परिसरातील काही जमीन महसूल विभागाने २४ आदिवासींना शेती करण्यासाठी दिली आहे. आदिवासींना धाकदपटशा दाखवून भूमाफिया या जमिनींवर चाळींची अनधिकृत बांधकामे उभारत होते. गाव परिसरातील गुरचरण, वन जमिनींवर अशा प्रकारची बांधकामे माफियांनी उभारली आहेत.तहसीलदार किरण सुरोसे, नायब तहसीलदार शाम सुतार, उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र व्हटकर, पोलीस निरीक्षक दिलीप आंधळे आणि कर्मचाऱ्यांनी पोलिस ताफ्यासह घोटसई गावातील आदिवासी जमिनीवर जाऊन तेथील बेकायदा बांधकामे जेसीबींच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. ही कारवाई थांबवण्यासाठी भूमाफियांनी काही स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत दबाव टाकण्याचा प्रयत्न चालवला होता. परंतु, तहसीलदारांनी कोणाचेही भ्रमणध्वनी न उचलता कारवाई पूर्ण केली.
भूमाफिया मोकाट
बांधकामे तुटल्याने कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याने माफिया चिंताग्रस्त बनले आहेत. अशा प्रकारची कारवाई या भागात कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे, असे किरण सुरोसे यांनी सांगितले. ही कारवाई सुरू असताना महापालिका हद्दीतील टिटवाळा भागात मात्र भूमाफिया बिनधास्तपणे बेकायदा चाळी उभारण्याची कामे करत होते.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2015 रोजी प्रकाशित
टिटवाळ्यात बेकायदा बांधकामे जमीनदोस्त
टिटवाळा, खडवली परिसरात भूमाफियांनी सरकारी, वन तसेच खासगी भूखंडांवर बेकायदे बांधकामे उभारण्याचा सपाटा लावला आहे.
First published on: 05-02-2015 at 01:14 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal construction destroyed in titwala