लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : खारफुटीचे घनदाट जंगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात स्थानिकांनी कल्याण डोंबिवली पालिकेचे अधिकारी, नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन कोणत्याही बांधकाम परवानग्या न घेता हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी केली आहे.

मध्य रेल्वेच्या डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला दिवा बाजूने हरितपट्ट्यावर मातीचे भराव टाकून, या भागातील झाडे, हरितपट्टा नष्ट करून या बेकायदा बांधकामांची भूमाफियांनी उभारणी केली आहे. मागील ३० वर्षात कोणीही भूमाफियाने कोपर भागात बेकायदा चाळी, इमारती उभारणीचे धाडस केले नव्हते. पण आता डोंबिवली खाडी किनारची बहुतांशी जागा भूमाफियांनी चाळी, बेकायदा इमारती बांधून हडप केली आहे. आरक्षित भूखंडावर इमले बांधून सज्ज झाले आहेत. आता डोंबिवलीत मोकळ्या जमिनी शिल्लक राहिल्या नसल्याने भूमाफियांनी कोपर पश्चिम रेल्वे स्थानक भागातील मोकळ्या सुमारे ५० ते ६० एकर जमिनीकडे आपल्या नजरा वळविल्या आहेत.

आणखी वाचा-तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड

या हरितपट्ट्यात शिरकाव करण्यासाठी कोपर पश्चिम रेल्वे स्थानक भागातून रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावरून भूमाफिया हरितपट्टयातील झाडे तोडण्यासाठी, तेथील खुरटी झाडे नष्ट करण्यासाठी जेसीबी, पोकलेन या रस्त्यावरून नेत आहेत. पालिका अधिकारी निवडणूक कामात व्यस्त आहे. त्याचा गैरफायदा भूाफियांनी घेतल्याची चर्चा आहे.

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पर्यावरण संवर्धनासाठी कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये हरितपट्टे विकसित करण्याचे आणि अस्तित्वातील हरितपट्टे संरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्त डॉ. जाखड यांच्या आदेशाला आव्हान देत कोपर भागात भूमाफियांनी हरितपट्ट्यात बेकायदा बांधकाम केले आहे. त्यामुळे आयुक्त याविषयी काय भूमिका घेतात याकडे पर्यावरणप्रेमी नागरिकांचे लक्ष आहे. हरितपट्ट्यात बांधकामे सुरू झाल्याने निसर्ग छायाचित्रकार, पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आयुक्त डॉ. जाखड यांनी हे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त कऱण्याची मागणी नागरिक करत आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्याने हे बांधकाम आमच्या हद्दीत नाही. या बांधकामाशी आमचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

आणखी वाचा-ठाणे : डायघर कचरा प्रश्न पेटणार, मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी

कोपर रेल्वे स्थानक भागात हरितपट्ट्यात बेकायदा बांधकाम कोणी केले असेल तर त्या बांधकामाची पाहणी करतो. ते बांधकाम बेकायदा असल्याचे दिसून आले तर ते तात्काळ जमीनदोस्त केले जाईल. -राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.