कल्याण – टिटवाळा बल्याणी भागात एका खासगी आस्थापनेच्या अतिउंच संरक्षित भिंतीचा आडोसा घेऊन उभारण्यात आलेल्या बेकायदा चाळी रविवारी सुट्टीचा दिवस असुनही टिटवाळा अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केल्या. शनिवार, रविवार पालिकेला सुट्टी असल्याने या सुट्टीच्या कालावधीत या बेकायदा चाळी रात्रंदिवस काम करून उभारल्या जातात. या बेकायदा बांधकामांची माहिती मिळाली की ही बांधकामे तात्काळ अ प्रभागाच्या तोडकाम पथकाकडून जमीनदोस्त केली जात आहेत.

मागील आठ महिन्याच्या काळात अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी एकही बेकायदा बांधकाम टिटवाळा मांडा परिसरात होऊ दिले नाही. उभी राहिलेली सर्व जुनी बांधकामे गेल्या आठ महिन्याच्या काळात अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने जमीनदोस्त केली. त्यामुळे अस्वस्थ झालेले भूमाफिया पावसाळ्यात पालिकेचे आपल्याकडे लक्ष नसेल असा विचार करून शनिवार, रविवार या सुट्टीच्या काळात दिवस रात्र कामे करून बेकायदा चाळी उभारणीचे धाडस करत आहेत.

पावसाळ्यातही एकही बेकायदा चाळ, गाळा, व्यापारी बांधकाम उभे राहणार नाही याची पूर्ण खबरदारी साहाय्यक आयुक्त पाटील यांनी घेतली आहे. सुट्टीच्या दिवशीही बीट मुकादमाने एकतरी फेरी प्रभागात मारण्याच्या सूचना पाटील यांनी केल्या आहेत. त्यामुळे प्रभागात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांची तात्काळ माहिती अ प्रभाग साहाय्यक आयुक्तांना मिळाली की दुसऱ्या दिवशी त्या बेकायदा बांधकामावर हातोडा पडत आहे.

टिटवाळा बल्याणी भागात एका उंच संरक्षित भिंत असलेल्या भागात बेकायदा चाळी उभारणीचे काम शुक्रवारी संध्याकाळी सुरू करून शनिवार रात्रीपर्यंत माफियांनी पूर्ण केले होते. चाळी उभारलेल्या भागात पोहच रस्ता नव्हता. अशा भागात या चाळी माफियांनी उभारल्या होत्या. रविवारी सकाळी या बेकायदा चाळींची माहिती साहाय्यक आयुक्त पाटील यांना मिळताच त्यांनी तात्काळ ही ओली बांधकामे जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. बेकायदा चाळींच्या ठिकाणी जेसीबी, वाहने जाण्यास सुविधा नव्हती. वाहने दूर मुख्य रस्त्यावर उभी करून घण, धारदार पहार घेऊन पथक पायवाटेने बेकायदा चाळींच्या ठिकाणी पोहचले. बल्याणी भागात उभारलेल्या बेकायदा चाळी मुसळधार पाऊस सुरू असताना जमीनदोस्त केल्या.

बांधकामासाठी आणलेल्या सीमेंट गोणी फोडून त्या पावसाच्या पाण्यात लोटून देण्यात आल्या. वाळू मातीमिश्रित करून पाण्याच्या डबक्यात लोटण्यात आली. या कारवाईने भूमाफियांचे चाळीतील खोल्या घाईने विकण्याचे मनसुबे पालिका पथकाने उधळले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिटवाळा अ प्रभाग हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहू दिले जाणार नाही. पावसाळ्यात कारवाई होत नाही या भ्रमात कोणीही बांधकामधारकाने राहू नये. मुसळधार पाऊस सुरू असला तरी बेकायदा बांधकामे तोडली जाणार आहेत. प्रभागात पालिकेच्या बीट मुकादमाची दररोज भ्रमंती असते याचे भान बांधकाम करणाऱ्यांनी ठेवावे.- प्रमोद पाटील,साहाय्यक आयुक्त,अ प्रभाग. टिटवाळा.