scorecardresearch

निळजे गावातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील निळजे गाव हद्दीत संकल्प बहुद्देशीय सामाजिक, शैक्षणिक संस्थेने बांधलेली बेकायदा बांधकामे महसूल विभागाने जमीनदोस्त केली.

(निळजे गावातील गुरचरण जमिनीवरील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त.)

डोंबिवली : कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील निळजे गाव हद्दीत संकल्प बहुद्देशीय सामाजिक, शैक्षणिक संस्थेने बांधलेली बेकायदा बांधकामे महसूल विभागाने जमीनदोस्त केली. गेल्या वर्षांपासून या बांधकामांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.
निळजे गावच्या हद्दीत गावाबाहेर १४ एकर गुरचरण जमीन आहे. या जमिनीपैकी ११ एकरच्या भूखंडावर संकल्प संस्थेने ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन या जागेवर शैक्षणिक उपक्रम सुरू केले होते. ग्रामपंचायतीकडून ठरावाद्वारे ही जमीन संकल्प संस्थेला काही वर्षांपूर्वी देण्यात आली होती. या जमिनीचा वापर शैक्षणिक, सामाजिक कामासाठी होत नाही. गुरचरण जमीन असूनही त्यावर बांधकामे कशी झाली असे प्रश्न करून डोंबिवलीतील जागरूक रहिवासी सौरभ ताम्हणकर यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे गेल्या वर्षांपासून या जमिनीवरील बेकायदा बांधकामे तोडण्याची मागणी केली होती.
मंडळ अधिकाऱ्यांनी या जमिनीवर अतिक्रमणे असल्याचा अहवाल महसूल विभागाला पाठविला होता. कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी दोन ते तीन वेळा संकल्प संस्थेला नोटीस पाठवून अतिक्रमणे स्वत:हून काढून घेण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी संस्थेकडून न झाल्याने तहसीलदार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार सुषमा आव्हाड, मंडळ अधिकारी कुंदन जाधव, दावडी, नेतिवली, हेदुटणे, निळजे, काटेमानिवली विभागाचे तलाठी यांच्या उपस्थितीत ही बेकायदा बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू असताना संकल्प संस्थेचे वसंत पाटील आणि इतर सदस्यांनी सामाजिक, शैक्षणिक भावनेतून या जागेवर उपक्रम राबविले जात आहेत. ३५० मुले या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे ही कारवाई करू नये अशी मागणी महसूल अधिकाऱ्यांकडे केली. अधिकाऱ्यांनी ती मानली आहे. कल्याण पूर्वेतील एका लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे ही कारवाई करण्यात आरोप संस्थेच्या पदाधिकाऱ्याने केला.
गुरचरण जमिनीवर अतिक्रमणे असल्याचे निदर्शनास आल्याने ती काढून टाकण्यात आली आहेत. या बांधकामाविषयी तक्रारी होत्या. – जयराज देशमुख, तहसीलदार

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Illegal constructions nilje village social educational institutions kalyan shilphata roads amy

ताज्या बातम्या