लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागातील ललित हायस्कूलच्या क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर स्थानिक चार जमीन मालक आणि इतर १० जणांनी शाळेच्या चालकांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत नियमबाह्य पध्दतीने मालकी हक्क दाखवून क्रीडांगण जागेचा ताबा घेतला. याप्रकरणी शाळा चालकांनी दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करून विष्णुनगर पोलिसांनी या जागेचा ताबा घेणाऱ्या आणि गुंडागर्दी करणाऱ्या एकूण १४ जणांच्या विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली पश्चिमेत कुंभारखाणपाडा येथे मॉर्डन इंग्लिश शाळेच्या बाजुला ललित इंग्रजी, हिंदी हायस्कूल आहे. ललित हायस्कुलला जोडून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान आहे. या मैदानावरून स्थानिक विरुध्द शाळा व्यवस्थापक यांच्यात वाद होता.
याप्रकरणी ललित हिंदी, इंग्रजी हायस्कूलचे सचीव राजेंद्रप्रसाद रामलखन शुक्ला (७१) यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शाळेच्या क्रीडांगणाचा बेकायदा ताबा घेणारे आरोपी हरिश्चंद्र बाळाराम म्हात्रे, सदाशिव बाळाराम म्हात्रे, लालचंद्र वसंत म्हात्रे, राजू वसंत म्हात्रे आणि इतर दहा जणांच्या विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत तपास केला. या प्रकरणात ललित शाळेच्या मैदानाचा ताबा घेणारे हरिश्चंद्र म्हात्रे आणि त्यांचे इतर सहकारी दोषी आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.
आणखी वाचा-डोंबिवलीतील कचोरे येथील गावदेवी मंदिरातील चांदीच्या पादुका चोरीला
कुंभारखाणपाडा हे बेकायदा बांधकामांचे आगर ओळखले जाते. या भागातून कल्याण डोंबिवली पालिकेचा वळण रस्ता जात आहे. त्यामुळे या भागातील जमिनींना वाढते भाव मिळत आहेत. स्थानिक, भूमाफिया यांची या भागातील जमीन हडप करण्याची वृत्ती वाढली आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पालिका हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहू दिले जाणार नाही असे आश्वासन दोन महिन्यापूर्वी दिले होते. आयुक्तांना आव्हान देत कुंभारखाणपाडा भागात भूमाफियांनी दिवसाढवळ्या बेकायदा इमारतींची कामे सुरू ठेवली आहेत. अशाच प्रकरणातील शाळेचा भूखंड हडप करण्याचे प्रकरण आहे.
आणखी वाचा-एसटीच्या ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे आरक्षण केंद्रांवर रांगा
पोलिसांनी सांगितले, कुंभारखाणपाडा येथे ललित हायस्कूल आहे. या शाळेला लागून शाळेचे मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान आहे. या मैदानाला ललित हायस्कूलच्या व्यवस्थापनाने गैरप्रकार टाळण्यासाठी शाळा आणि मैदानाला जोडणाऱ्या भागात लोखंडी दरवाजा लावला आहे. या मैदानाच्या जागेवरून आरोपी आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात वाद सुरू आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हरिश्चंद्र म्हात्रे, सदाशिव, लालचंद्र, राजू हे कुंभारखाणपाडा, नवापाडा भागात राहत असलेले रहिवासी सोबत दहा जण घेऊन झुंडीने ललित हायस्कूलजवळ आले. त्यांनी रागाच्या भरात मैदानाला लावलेला लोखंडी दरवाजा तोडून टाकला. या कारवाईला विरोध करणाऱ्या शाळा सचिव राजेंद्रप्रसाद शुक्ला यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. शुक्ला यांना बाजुला ढकलून देत आरोपींनी मैदानात घुसून बेकायदा मैदानाचा ताबा घेतला. मैदानात शाळा व्यवस्थापनाने शिरकाव करू नये म्हणून मैदानाच्या सभोवती सिमेंटचे खांब आणि त्याला हिरवी जाळी लावून मैदानाचा नियमबाह्यपणे ताबा घेतला. या घुसखोरीप्रकरणी शाळेने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून सहा महिन्यांनी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.