ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलात बेकायदा टर्फ बांधून त्यातून आर्थिक नफा कमाविणाऱ्या व्यवसायिकांना अखेर कायमचा लगाम लागला आहे. ठाणे महापालिकेने येथील टर्फ उखडून बेकायदा टर्फ बांधणाऱ्या काही व्यवसायिकांवर महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियमांतर्गत (एमआरटीपी) गुन्हे दाखल केले आहे. या टर्फमध्ये खेळण्यासाठी प्रत्येक तासाला दीड ते दोन हजार रुपयांची आकारणी केली जात होती. टर्फमुळे येथील वन्यजीवांना प्रखर प्रकाशझोताचा त्रास सहन करावा लागत होता. बेकायदेशीर टर्फ पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागात असून परिसंस्थेला धोका पोहोचवत होते. यामुळे वन्यजीवांच्या अस्तित्वावर परिणाम होतो तसेच ध्वनी प्रदूषण नियमांचा भंग केला जात आहे असल्याचा आरोप पर्यवावरणवादी करत होते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलात आदिवासींच्या जमीनी कमी किमतीत घेऊन मोठ्याप्रमाणात बेकायदा बांधकामे झाली आहेत. येथील रात्री-अपरात्री होणाऱ्या पार्ट्यांमुळे आदिवासी हैराण झाले. तसेच वन्यजीवांना देखील याचा त्रास होतो. याबाबत आदिवासी आणि पर्यावरणवाद्यांनी अनेक आंदोलने केली. काही वर्षांपूर्वी व्यवसायिकांनी येथे १० टर्फ बांधले होते. हे टर्फ पूर्णपणे बेकायदा असल्याने येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीने २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली होती. त्यानंतरही सुमारे दीड वर्ष हे टर्फ दिवस-रात्र सुरुच होते. प्रत्येक तासाला दीड ते दोन हजार रुपये खेळण्यासाठी आकारले जात होते. संस्थेने संबंधित टर्फचे छायाचित्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केले.

जुलै महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने हे सर्व टर्फ पाडण्याचे आदेश ठाणे महापालिकेला दिले होते. परंतु त्यानंतरही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण टर्फवर कारवाई केली नव्हती. अखेर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याचिकाकर्ते रोहीत जोशी यांंच्यासोबत तातडीने बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व टर्फची जमीन उखडून टाकावी आणि त्याचे छायाचित्र पाठवावे, संबंधित जमीन मालक आणि टर्फ मालकाविरोधात एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावे आणि जागांचे पाणी, विद्युत पुरवठा तोडावा अशी सूचना केली होती. त्यानुसार आता ही कारवाई ठाणे महापालिकेने पूर्ण केली आहे. तसेच संबंधित व्यवसायिकांवर गुन्हे देखील दाखल झाले.

ठाणे महापालिकेला या प्रकरणात एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची विनंती केली होती. त्यानुसार वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. येऊरमधील वन्यजीवांची आता तीव्र प्रकाशझोत आणि गोंगाटापासून बहुतांश प्रमाणात सुटका झाल्याचे समाधान आहे. – रोहीत जोशी, याचिकाकर्ते.

याप्रकरणात ठाणे महापालिकेने तक्रार दाखल केल्यानंतर एमआरटीपी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. –राजकुमार वाघचौरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे.