अंबरनाथः जुन्या वादातून दोन कंत्राटदारांच्या टोळ्यांमध्ये चक्क अंबरनाथ नगरपालिका मुख्यालयातच राडा झाला. पालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील प्रवेशद्वारावरच या तुफान हाणामारीच्या घटनांमुळे पालिकेत एकच खळबळ उडाली. पालिकेतील सुरक्षा रक्षक आणि अतिक्रमण विभागाच्या दालनांमध्ये हे टवाळखोर शिरले. त्यांना उपस्थितांनी बाहेर काढले. या प्रकारामुळे अंबरनाथच्या पालिका मुख्यालयातील सुरक्षिततेचे वाभाडे निघाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरूद्ध दिलेल्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्याच्या विधान भवनाच्या आवारात कार्यकर्त्यांमुळे झालेल्या राड्यामुळे संपूर्ण राज्य अवाक झालेले असतानाच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिका मुख्यालयातही कार्यालयीन वेळेत तुफान हाणामारी पाहायला मिळाली. गुरूवारी अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत फेरिवाला धोरण जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जात होती. त्यामुळे पालिकेत पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी काही कंत्राटदार आणि त्यांचे काही सहकारी उपस्थित होते.

या दोन गटांमध्ये अचानाक तुंबळ हाणामारी सुरू झाली. हाणामारी करणारे मुख्य भागातून थेट शेजारी असलेल्या अतिक्रमण विभागाच्या दालनापर्यंत पोहोचले. या हाणामारीमुळे पालिकेत एकच गोंधळ उडाला. अनेकांना नेमके काय झाले हे कळाले नाही. यावेळी पालिका मुख्यालयात आलेल्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

अंबरनाथ नगरपालिकेची लहान मोठी कामे करणारा कंत्राटदार बॉस्को सुशेनाथ आणि व्यंकटेश पिचिकरन या दोन कंत्राटदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू वाद असल्याची माहिती आहे. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंतही गेला होता. या हाणामारीत व्यंकटेश या कंत्राटदाराच्या समर्थकांनी बॉस्को या कंत्राटदाराला जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे बोस्को याने सांगितले. ही हाणामारी सुरू असताना प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांनी आणि पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी ही हाणामारी रोखण्याचा प्रयत्न केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी दोन्ही गटांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले असून पोलिस अधिक तपास करत आहेत. तर याबाबत मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना विचारले असता पालिकेने या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार दिली असून यापुढे पालिकेत सुरक्षा व्यवस्था कठोर करत पालिकेशी संबंधित काम असणाऱ्यांना प्रवेश यंत्रणेद्वारेच पालिकेत प्रवेश दिला जाईल, असे ते म्हणाले.