अंबरनाथः अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्याने उद्घाटन झालेल्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात सध्या नाट्य महोत्सव सुरू आहे. या नाट्यमहोत्सवाच्या निमित्ताने दर्जेदार नाटके अंबरनाथकरांसाठी मोफत आयोजीत करण्यात आली आहे. बुधवारी विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाईंडर नाटकासाठी नाट्यगृह अक्षरशः खचाखच भरले होते. या प्रयोगासाठी लोकप्रतििनधींसह अनेकांनी खाली बसकन मारून तीन तासांचे नाटक पाहिले. गुरुवारी देवबाभळी नाटकालाही प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. येत्या रविवरापर्यंत आणखी तीन नाटके अंबरनाथकरांना पाहता येणार आहेत.
शहरासाठी स्वतंत्र आणि अद्ययावत नाट्यगृहाचे अंबरनाथकरांचे स्वप्न गेल्या रविवारी पूर्ण झाले. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी नाट्य, सिने क्षेत्रातील नामवंत कलावंतांनी हजेरी लावली होती. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते येथे आठ दिवस नाट्यमहोत्सव आयोजीत करण्यात आला. त्यामुळे अंबरनाथ आणि आसपासच्या रसिकांना दर्जेदार नाटकांचा मोफत आस्वाद घेता येतो आहे. त्यानिमित्त सध्या गाजत असलेली वेगवेगळ्या धाटणीची नाटके येथे आयोजीत करण्यात आली आहेत.
उद्घाटनाच्या दिवशी भरत जाधव यांचे पुन्हा सही रे सहीचा प्रयोग हाउसफुल्ल झाला. दुसऱ्या दिवशी करून गेलो गाव या विनोदी नाटकाने रसिकांना भूरळ घातली. तिसऱ्या दिवशी आज्जीबाई जोरात हे नाटक रसिकांनी डोक्यावर घेतले. बुधवारी विजय तेंडुलकर लिखीत सखाराम बाईंडर या नाटकासाठी दुपारी तीन वाजल्यापासून प्रेक्षकांनी नाट्यगृहात गर्दी केली होती. नाटक सुरू होण्यापूर्वी तासभर आधीच नाट्यगृह पूर्ण क्षमतेने भरून गेले.
त्यानंतर अनेकांनी नाट्यगृहात खालीच बसकन मारून नाटक पाहिले. अनेकांनी तब्बल तीन तासांचा प्रयोग उभ्याने पाहिला. शहरातील अनेक माजी लोकप्रतिनिधींनीही खाली बसकम मारून अंबरनाथकरांसह नाटकाचा आस्वाद घेतला. तर गुरूवारी देवबाभळी नाटकही हाऊसफुल्ल झाले.
अंबरनाथच्या या नाट्यगृहात शुक्रवारी गूढ आणि थरारक धाटणीचे मी वर्सेस मी या नाटकाचा प्रयोग होईल. तर शनिवारी जयवंत दळवी यांच्या पुरूष नाटकाचा प्रयोग आयोजीत करण्यात आला आहे. या नाट्य महोत्सवाचा समारोप शिवबा या महानाट्याने होणार आहे.
आसपासच्या शहरातील रसिकही नाटकासाठी अंबरनाथमध्ये अंबरनाथ शहरासह नेरळ, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ ग्रामीण आणि कल्याण तालुक्यातील रसिक प्रेक्षकही अंबरनाथच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात गर्दी करत आहेत. त्यामुळे नाट्यगृह प्रशासनाला गर्दी व्यवस्थापनात मोठी कसरत करावी लागते आहे.
