डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्त्यावरील एका सोसायटीतील आकर्षक गुंतवणूक योजनेच्या कार्यालयातील भागीदार, कर्मचाऱ्यांनी डोंबिवली परिसरातील ७८ जणांना आकर्षक नफा, विविध गुंतवणूक योजनांची माहिती देऊन तीन कोटी ७० लाख ५५ हजार रूपये जमा केले. या गुंतवणुकीवरील आकर्षक परतावा किंंवा मूळ रक्कम परत न करता गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केली आहे.
या फसवणूक प्रकरणी डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रोडवरील कुंभारखाणपाडा भागात राहणारे महेश रमेश भोईर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार केली आहे. पोलिसांनी तक्रारदार महेश भोईर यांच्या तक्रारीवरून प्राथमिक संशयित गौरम राम भगत, विकीन वसंत पटणे, देवेंद्र यशवंत तांबे, परेश हनुमान भोईर, दर्शन ज्ञानेश्वर म्हात्रे, दीपेश दत्ताराम दांडेकर, अर्चना कळंगे, गीता ठक्कर यांच्या विरूध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या फसवणूक, संघटित गुन्हेगारी कायद्याने संशयितांंविरुध्द गु्न्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महेश रमेश भोईर डोंबिवलीत वाहन धुलाई केंद्र चालवतात. मे २०२१ ते जुलै २०२२ या वर्षभराच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. बापूसाहेब फडके रस्त्यावरील आनंदी आनंद सोसायटीच्या दुसऱ्या माळ्यावरील कार्यालय आणि डोंबिवली पश्चिमेत सुभाष रस्त्यावरील पुष्पहास सोसायटीतील मेसर्स फिनिक्स इन्व्हेस्टमेंट व मेसर्स फिनिक्स फायनान्शियल सोल्युशन एल. एल. पी. कार्यालयात हे फसवणुकीचे प्रकार घडले आहेत, असे महेश भोईर यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कोणाला अटक करण्यात आले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
तक्रारदार महेश रमेश भोईर यांनी पोलीस ठाण्यातील प्राथमिक तपासणी अहवालात दिलेली माहिती, अशी की फिनिक्स इन्व्हेस्टमेंट डोंबिवली पूर्व, पश्चिमेत कार्यालयात आहेत. १ मे २०२१ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत मे. फिनिक्स इन्व्हेस्टमेंटच्या भागीदार संस्थांचे पदाधिकारी आणि या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपली व आपल्या सारख्या इतर ७७ गुंतवणूकदार यांना झटपट चांगला नफा मिळवून देणाऱ्या आकर्षक गुंतवणूक योजनांची माहिती दिली. कमी कालावधीत अधिकचा परतावा मिळतो म्हणून डोंबिवली परिसरातील ७८ ग्राहकांनी मे. फिनिक्सच्या गुंतवणूक योजनेत एकूण तीन कोटी ७० लाखाच्या रकमा गुंतवल्या.
गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक योजनांची इंग्रजी भाषेतील प्रमाणपत्रे दिली. त्यामुळे आपली गुंतवणूक सुरक्षित आणि खात्रीलायक असल्याचे ग्राहकांना सुरुवातीला वाटले. गुंतवणूक योजनेची मुदत संपल्यावर ग्राहकांना विहित वेळेत नफा मिळणे आवश्यक होते. तो गुंतवणूक कंपनीकडून देण्यात आला नाही. त्यानंतर गुंतवणूकदारांनी संबंधित पदाधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणे सुरू केले. त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. नफा नाही पण आमची मूळ रक्कम परत करा असा तगादा गुंतवणूकदारांनी लावण्यास सुरूवात केली. त्यालाही अपेक्षित प्रतिसाद गुंतवणूक कंपनीच्या भागीदारांकडून मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर गुंतवणूकदारांनी महेश भोईर यांच्या पुढाकाराने रामनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीची तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक नरळे याप्रकरणाचा तपास करत आहेत.