डोंबिवली: घरात देवाची पूजा करत असताना दिव्याची पेटती वात अंगावर पडून डोंबिवली पूर्वेतील पिसवली भागातील एक महिला गंभीररित्या भाजली होती. या महिलेवर जवळच्या आणि त्यानंतर डोंबिवली एमआयडीसीतील एका रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आले. परंतु, ही महिला गंभीररित्या भाजली असल्याने उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. शनिवारी ही घटना घडली आहे.

अर्चना धर्मेंद्र कुमार (४८) असे मयत महिलेचे नाव आहे. ही महिला आपल्या कुटुंबीयांसह डोंबिवली पूर्वेतील पिसवली भागातील दुर्गामाता मंदिर भागात राहत होती. या मृत्युप्रकरणी महिलेचा पती धर्मेंद्र कुमार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद करून घेतली आहे.मृत महिलेचे पती धर्मेंद्र कुमार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपली पत्नी अर्चना कुमार ही शनिवारी सकाळी घरात देवपूजा करत होती.

देव पुजा झाल्यानंतर अर्चना दिवे तयार करून ती देवांना ओवाळत होती. यावेळी दिव्यातील पेटती वात बाहेर पडून ती अर्चनाच्या अंगावर पडली. यावेळी तिच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. तलमलीत कपडे असल्याने कपडयांनी वेगाने पेट घेतला. अर्चनाला स्वत:चा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे अंगावरील कपडे पेटल्याने अर्चनाचे शरीर भाजले गेले. तिला तातडीने कल्याण पूर्वेतील काका ढाबा परिसरातील जानकी ग्लोबल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. प्रकृती गंभीर झाल्याने तेथील डाॅक्टरांनी अर्चना यांना डोंबिवली एमआयडीसीतील डाॅ. मिलिंद शिरोडकर यांच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली.

अर्चना यांना तेथून तातडीने उच्च उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. एम्स रुग्णालयात डाॅक्टरांनी अर्चना यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, अर्चना यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली. त्यांनी उपचारांंना प्रतिसाद देणे बंद केले. एम्स रुग्णालयातील डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणाचा तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बंंडगर करत आहेत.