डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी आपल्या पत्नी आणि कार्यकर्त्यांसह भाजप सदस्यत्वाचा राजीनामा गेल्या आठवड्यात दिला होता. नाराज म्हात्रे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असतानाच सोमवारी संध्याकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विकास म्हात्रे यांची भेट घेतली. या भेटीनंतर विकास म्हात्रे राजीनामा मागे घेत भाजपसाठी जोमाने काम करण्याचे आश्वासन मंत्री चव्हाण यांना दिले.

गेल्या मंगळवारी (ता.१६) विकास म्हात्रे, पत्नी कविता आणि त्यांच्या भाजप कार्यकर्त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा डोंबिवली पश्चिम मंडलाचे अध्यक्ष समीर चिटणीस यांच्याकडे दिला होता. यामुळे भाजप गोटात खळबळ उडाली होती. केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार असताना आपल्या राजूनगर, गरीबाचापाडा प्रभागात रस्ते, गटार इतर विकास कामे होत नसल्याने नागरिक नाराज आहेत.

हेही वाचा…ठाण्यात दुरुस्ती कामानंतर पाणी टंचाई

नागरिकांच्या रोषाला आपणास सामोरे जावे लागते. इतर प्रभांगांमध्ये मात्र विकास कामांसाठी अधिकचा निधी उपलब्ध होत आहे. मग आपल्याच प्रभागांवर अन्याय का, असे प्रश्न म्हात्रे यांनी राजीनामा देताना उपस्थित केले होते. डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्वाधिक विकास कामांसाठी निधी विकास म्हात्रे यांच्या प्रभागात दिला आहे. जुन्या निष्ठावंतांना डावलून चव्हाण यांनी विकास म्हात्रे यांना स्थायी समिती सभापती केले होते. असे असूनही म्हात्रे यांनी राजीनामा दिल्याने भाजप कार्यकर्ते तीव्र नाराजी व्यक्त करीत होते. यापूर्वीही म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी चव्हाण झटकन म्हात्रे यांना भेटले होते.

भरभरून देऊनही म्हात्रे यांनी राजीनामा दिल्याने मंत्री चव्हाण यांनी नाराजी व्यक्त करत त्यांची तातडीने भेट घेणे टाळले होते. मंडल पदाधिकारी म्हात्रे यांना भेटून त्यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून समजूत घालत होते. शिवसेनेने म्हात्रे यांना तातडीने व्दार खुले केले नाही. अडचणीत सापडलेल्या म्हात्रे यांनी आपण भाजपत राहणार आहोत, आपला राजीनामा पालिकेतील शासकीय सेवेतून आलेल्या अधिकाऱ्यांविरूध्द आहे अशी भूमिका घेऊन मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्केंना का दिली चांदीची गदा?

मंडल अध्यक्ष समीर चिटणीस यांनी मध्यस्थी करून सोमवारी मंत्री रवींद्र चव्हाण, विकास म्हात्रे यांची भेट घडवून आणली. या भेटीत म्हात्रे यांचे सर्व गैरसमज दूर करण्यात आले. चव्हाण यांच्या भेटीनंतर म्हात्रे यांनी राजीनामा मागे घेत भाजपसाठी पुन्हा जोमाने काम करण्याची तयारी दर्शवली.

फाडलेले फलक

राजीनामा दिल्यानंतर म्हात्रे यांनी जनसंपर्क कार्यालया बाहेरील भाजपचे फलक काढले होते. ते पुन्हा त्यांना बसवावे लागणार आहेत. मागील काही महिन्यांपासून ते भाजप कार्यकर्त्यांना छातीवर कमळ लावण्यासही मज्जाव करत असल्याच्या तक्रारी होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर विकास म्हात्रे यांनी राजीनामा मागे घेतला. त्यांचे गैरसमज दूर करण्यात आले. भाजपसाठी ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. – समीर चिटणीस, अध्यक्ष, डोंबिवली पश्चिम मंडल.