डोंबिवली : येथील आयरे भागातील सरस्वती शाळे जवळील ६५ महारेरा प्रकरणातील एक बेकायदा इमारत ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. कल्याण मधील आय प्रभागा नंतर डोंबिवलीत भुईसपाट करण्यात आलेली अनेक महिन्यांनंतरची ही पहिलीच बेकायदा इमारत आहे. आयरे गावात दिलीप पंढरीनाथ पाटील यांनी पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता पाच माळ्याची इमारत बांधली होती. या इमारती विषयी ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. ही इमारत गुन्हे दाखल ६५ महारेरा प्रकरणातील होती. तक्रारींच्या अनुषंगाने साहाय्यक आयुक्त देशमुख यांनी दिलीप पाटील या भूमाफियाला कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसा दिल्या. त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. ही इमारत अनधिकृत घोषित करून देशमुख यांनी पोलीस बंदोबस्तात इमारत भुईसपाट केली.

हेही वाचा…कल्याणमधील भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय यांच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींना महारेरा नोंदणी प्रमाणपत्र घेऊन गुन्हे दाखल होऊन चौकशी सुरू असलेल्या प्रकरणातील ही बेकायदा इमारत होती. या बेकायदा इमारतीच्या ठिकाणी जाण्यासाठी आयरे गाव येथील रेल्वे पुलाचा अडथळा होता. त्यामुळे उंच, अवजड यंत्रणा येथे जाऊ शकली नाही. मग मनुष्यबळाचा वापर करून साहाय्यक आयुक्त देशमुख यांनी १२दिवसांच्या कालावधीत ही इमारत भुईसपाट केली. या कारवाईसाठी अधीक्षक डी. एस. चौरे, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी महत्वाचे सहकार्य केले. एक पोकलने, दोन जेसीबी या इमारतीच्या तोडकामासाठी तैनात होते.

आयरे भागात एकूण ३५ हून अधिक बेकायदा बांधकामे सुरू आहेत. रस्ते, गटार, विकास आराखड्यातील रस्ते बंद करून ही कामे केली जात आहेत. या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार सुदर्शन म्हात्रे यांनी केली आहे. ज्या साहाय्यक आयुक्तांनी यापूर्वी या बेकायदा बांधकामांची पाठराखण केली. त्या सर्व अधिकाऱ्यांच्या या प्रभागातून यापूर्वी तडकाफडकी बदल्या झाल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेत ह प्रभागात अशीच तोडफोड मोहीम हाती घेण्याची मागणी नागरिक करत आहेत. आय प्रभागात साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आतापर्यंत ५ हून अधिक बेकायदा इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. शंभरहून अधिक बेकायदा चाळी, गाळे तोडले आहेत.

हेही वाचा…डोंबिवलीत रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न; चाकू, दगडाचा वापर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयरे गावातील इमारत महारेरा प्रकरणातील होती. या इमारतीत घरे घेऊन नागरिकांची माफियांकडून फसवणूक होऊ नये म्हणून ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. – सोनम देशमुख,साहाय्यक आयुक्त ग प्रभाग, डोंबिवली.