डोंबिवली : दिवाळीच्या पहिल्या दिवशी येथील फडके रोडवर येणाऱ्या तरूणाईला उत्साहाचे उधाण आणि आनंदाचे भरते येते. बालगोपाळ, तरूण, तरुणी विविध रंगी, पारंपारिक पेहरावात, काही जण विशिष्ट वेशभूषा करून रविवारी फडके रोडवर आले होते. मित्र-मैत्रिणी, आप्तस्वकीयांकडून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. फडके रोडचा कोपरा आणि कोपरा मित्रांसमवेत सेल्फी काढण्यासाठी दंग होता. डोंबिवली गाव स्वरुपात होते. त्यावेळी गावच्या वेशीवरील गणेश मंदिर परिसरात दिवाळीच्या पहिल्या दिवशी गावातील विविध स्तरातील मंडळी एकत्र जमून दिवाळीचा आनंद लुटत होते. एकमेकांना शुभेच्छा देत होते. ही परंपरा मागील काही वर्षापर्यंत पारंपारिक पध्दतीने पाळली जात होती. आता या परंपरेला ‘टेक्नोसॅव्ही’ रूप आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दररोजचे महाविद्यालय, खासगी शिकवणाऱ्या, इतर अभ्यासक्रमात व्यस्त असलेल्या तरूणांना अनेक वेळा दैनंदिन भेटणे शक्य होत नाही. काही तरूण विदेशात नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त असतात. ते दिवाळी निमित्त डोंबिवलीत, कल्याणमध्ये आलेले असतात. अशा वर्गमित्रांना एकत्रित स्वरुपात भेटण्याचे ठिकाण म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. फडके रोडवरची दिवाळी मित्र-मैत्रिणींसोबत साजरी करण्यात एक वेगळा आनंद असतो. फडके रोड दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारपर्यंत तरूणाईने गजबजून गेलेला असतो.

हेही वाचा : “कुठलंही काम करताना धाडस लागतं, आपला हेतू शुद्ध असल्यावर…”, मुख्यमंत्र्यांचं ठाण्यात विधान

वर्षभरातील गप्पाचा शिल्लक साठा येथे खाली केला जातो. वर्षभरात घेतलेले किमती मोबाईल, माॅडेल बदलले त्याप्रमाणे बाजारात आलेल्या नवीन गाड्या आणि त्यांची खरेदी, बदललेली नोकरी आणि मिळालेले रग्गड पॅकेज. अशा गप्पांमध्ये तरूण, तरूणाई व्यस्त होती. अनेकांनी घरी आईने तयार केलेला फराळ आणला होता. त्यावर ताव मारला जात होता. फडके रोडवरील हाॅटेल्स, चहाचे ठेले गजबजून गेले होते.

पारंपारिक, विशिष्ट वेशभुषेत आलेले तरूण आजुबाजुला सुरू असलेल्या गाण्यांच्या तालावर थिरकत होते. आपण गर्दीत एकदम वेगळे, असा थाट, रूबाब दाखविण्यासाठी काही तरूण विशिष्ट लयीत चालण्याची अदाकरी दाखवत होते. त्यांच्याकडे पाहून हास्याच्या लहरी फडके रोडवर उमटत होत्या.

हेही वाचा : राज्यातील पोलीस हतबल; उद्धव ठाकरे

मोबाईलवर ध्वनीमुद्रित गाणी वाजवून तरूणांचे काही गट रस्त्यांवर गाण्यांच्या तालावर ठेका धरून नाचत होते. आनंदाच्या उधाणाने फडके रोड न्हाऊन निघाला होता. शहरातील सर्व स्तरातील ज्येष्ठ, जाणते नागरिक कुटुंबासह आपले जुने दिवस आठवत फडके रोडवर गणपती दर्शनासाठी आले होते. बालगोपाळ मंडळी श्री कृष्ण, विदूषक अशा पेहरावात आपल्या कुटुंबीयांसह आली होती. त्यांची प्रतीमा टिपण्यासाठी तरूणांचे मोबाईल कॅमेरे लखलखत होते.

गाण्यांच्या कार्यक्रमांमुळे हिरमोड

वर्षभरातून एकदा एकत्र येण्याचा, सार्वजनिक ठिकाणी गप्पा मारण्याचा दिवस म्हणून तरूणाई फडके रोडवर येते. मागील सहा वर्षापासून या तरूणाईचे मतांमध्ये, आपल्या पक्षाच्या बाजुने खेचण्यासाठी काही राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेत. यासाठी दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रोडवर काही राजकीय नेते, मंडळींनी यापूर्वी गणपती दर्शनाचे निमित्त काढून हजेरी लावली आहे. त्याचा फार फायदा न झाल्याने या मंडळींनी नंतर या कार्यक्रमांमध्ये पाठ फिरवली.

हेही वाचा : श्री गणेश मंदिराच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त डोंबिवलीत फडके रोडवर आकर्षक रोषणाई

रविवारी गणेश मंदिरतर्फे अप्पा दातार चौकात, एका वाहिनीतर्फे मदत ठाकरे चौकात आणि माॅर्डन कॅफे हाॅटेलसमोर शिवसेनेतर्फे गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले होते. गणेश मंदिराचा कार्यक्रम जुना आणि या कार्यक्रमासाठी नागरिक आवर्जून येतात. आता काही राजकीय मंडळी रस्ते अडवून तरूणाईला आकर्षित करण्यासाठी फडके रोडवर मंडप टाकून रस्ता अडवून ठेवत असल्याने तरूणांनी तीव्र नराजी व्यक्त केली. आम्ही गाण्यांपेक्षा गप्पा मारणे, शुभेच्छा देण्यासाठी आलेले असतो. गाण्यांमध्ये आम्हाला रस नाही, असे तरूणांनी सांगितले. गाण्यांमुळे सकाळपासून फडके रोडवर आलेल्या ढोल पथकांना आपले वादन, त्यामधील अदाकरी दाखवता आली नव्हती. गणपती दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli at phadke road youth are unhappy due to the songs played by political parties during diwali celebration css
First published on: 12-11-2023 at 13:03 IST