डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळील मैदानात मौजमस्ती करत पहाटेच्या वेळेत भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्या १५ जणांच्या तरूणांच्या टोळक्याने दोन खासगी मोटार चालकांच्या वाहनांची ठाकुर्ली चोळेगाव येथे मोडतोड केली आहे. या दोन्ही वाहनांचे चालक या तरूणांच्या टोळक्याला घाबरून पळून गेले म्हणून ते थोडक्यात बचावले. यामधील तीन तरूण हे डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव मधील आहेत. रामनगर पोलीस ठाण्यात या १५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली जवळील पिसवली गावात राहणारे सर्वेश जोईल (२९) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सर्वेश नवी मुंबईतील एका कंपनीत कर्मचाऱ्यांना आपल्या खासगी मोटारीने घर ते कार्यालय नेण्या आणण्याचे काम करतात. सर्वेश यांचा सहकारी महेश कदम हेही आपल्या खासगी मोटारीने प्रवाशांना घर ते कार्यालय नेण्या आणण्याचे काम करतात. चार दिवसापूर्वी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान महेश कदम डोंबिवली पश्चिमेतील प्रवासी घरी सोडून ठाकुर्ली पुलाजवळील रेल्वे मैदान भागातून आपल्या मोटारीने ठाकुर्ली चोळे भागात चालले होते.
ठाकुर्ली उड्डाण पूल भागातून जात असताना महेश कदम यांच्या मोटारीसमोर १२ ते १५ तरूण भरधाव वेगात वेडीवाकडी पध्दतीने वाहने चालवित होती. या वाहन चालविण्याच्या पध्दतीने अपघात होईल. वाहनामध्ये महिला आहे. त्यामुळे महेश कदम यांनी आपल्या वाहनाचा वेग कमी करून बेशिस्तीने वाहने चालविणाऱ्या तरूणांना व्यवस्थित वाहन चालविण्याची सूचना केली. त्यावेळी तरूणांनी महेश कदम यांच्याशी हुज्जत घालून तू आम्हाला हे सांगणारा कोण, असे प्रश्न करून त्यांना मारहाण करण्याच्या इराद्याने त्यांच्या मोटारीची ठाकुर्ली चोळेगाव पर्यंत पाठलाग केला.
हे तरूण आपणास संघटितपणे मारहाण करतील म्हणून महेश यांनी आपला मित्र सर्वेश यांना चोळेगाव ठाकुर्ली येथे येण्यास सांगितले. सर्वेश चोळे गाव श्री मुक्तेश्वर महादेव मंदिर येथे पोहचले. तोपर्यंत १५ तरूणांचे एक टोळके हातात दांडके, दगड घेऊन वेगाने महेश कदम यांच्या दिशेने येत होते. त्यावेळी महेश यांनी आपणास मारहाण होईल या भीतीने आपली मोटार तेथेच सोडून पळ काढला. सर्वेश यांनीही तेथून पळ काढला. हे दोन्ही चालक हातात न सापडल्याने तरूणांच्या टोळक्याने दोन्ही चालकांच्या वाहनांची तोडफोड केली.
मोटार चालक प्रशांत लिंगम यांनी अशाप्रकारची तोडफोड करणारे तरूण हे मोठागाव मधील आर्यन सावंत, नैतिक पाटील, लक्ष सावंत असल्याची माहिती सर्वेश, महेश कदम यांना दिली. महेश यांनी पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. सर्वेश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोठागाव मधील नैतिक पाटील, आर्यन सावंतसह इतर १५ जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
