डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील महावितरणच्या गरीबाचावाडा भागात दररोज सकाळ, रात्री दीड ते दोन तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने या भागातील नागरिक संतप्त आहेत. सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे गरीबाचावाडा, गोपीनाथ चौक भागातील नागरिक महावितरणच्या रेतीबंदर चौकातील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा विचार करत आहेत.

महावितरणच्या गरीबाचावाडा विभागात महाराष्ट्रनगर, गोपीनाथ चौक परिसर येतो. मागील काही दिवसांपासून सकाळी दहा वाजता वीज पुरवठा खंडित झाला की त्यानंतर दीड ते दोन तास वीज पुरवठा गायब असतो. वीज पुरवठा सुरू झाला की त्यानंतर विजेचा लपंडाव दिवसभर गरीबाचावाडा, गोपीनाथ परिसरात सुरू असतो. संध्याकाळी पुन्हा वीज पुरवठा खंडित झाला की त्यानंतर दोन तास वीज पुरवठा गायब असतो. महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना यासंदर्भात संपर्क केला की त्यांचे मोबाईल फोन बंद असतात.

सोमवारी संध्याकाळी सहा वाजता खंडित झालेला गरीबाचावाडा फिडरचा वीज पुरवठा रात्री पावणे नऊ वाजता सुरू झाला. बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता गरीबाचावाडा फिडरचा वीज पुरवठा खंडित झाला. हा वीज पुरवठा साडे अकरा वाजता पूर्ववत झाला. वीज पुरवठा सतत खंडित होत असताना महावितरणचे स्थानिक अधिकारी वीज पुरवठा अखंडित राहील यादृष्टीने कोणतीही कृती करत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. गरीबाचावाडा विभागात अनेक ठिकाणी जुन्या वीज वाहिन्या ऐकमेकांना जोडून तात्पुरता वीज पुरवठा सुरू आहे. या वीज वाहिन्या खोदकाम करताना, मुसळधार पावसात खराब होतात. त्यामुळे या भागात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याची चर्चा आहे.

तसेच, गरीबाचापाडा भागात अनेक नवीन इमारतींची कामे सुरू आहेत. या ठिकाणी तात्पुऱ्या स्वरुपात विकासकाने घेतलेल्या वीज मीटरवर या रहिवास निर्माण झालेल्या इमारतीमधील रहिवाशांना काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपातील वीज मीटरवरून थेट घराघरात जोडण्याचे देण्याचे प्रकार घडले आहेत. डोंबिवलीत बहुतांशी कर्मचारी कार्यालयीन काम घरातून सुरू असतात. काम सुरू करण्याच्या सकाळच्या वेळेत वीज पुरवठा खंडित होतो. डोंबिवली पश्चिमेत गरीबाचावाडा विभागात हे वीज जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्थानिक नागरिकांनी या सततच्या वीज लपंडावा संदर्भात महावितरणच्या कार्यालयात तक्रारी करून त्याची दखल घेण्यात येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

गरीबाचावाडा भागात अनेक चाळी, व्यापारी गाळ्यांमध्ये रहिवासी घरगुती पध्दतीने गृहपयोगी वस्तू तयार करण्याचे व्यवसाय करतात. हे व्यवसाय विजेवर अवलंबून आहेत. दुकानात वीज पुरवठा नसेल तर व्यापाऱ्यांना दुकानात काम करणे अवघड होते.

महावितरणचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांनी डोंबिवली पश्चिमेत गरीबाचावाडा विभागात होणाऱ्या सततच्या खंडित वीज पुरवठ्याची माहिती घेऊन वीज पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पावसामुळे वीज वाहिन्यांमध्ये काही तांत्रिक बिघाड होतात. त्यामुळे असे प्रकार होतात. आपण स्वता गरीबाचावाडा विभागात भेट देऊन वीज पुरवठा सतत खंडित का होतो याची माहिती घेतो. आणि तो सुरळीत राहील यादृष्टीने प्रयत्न करतो. – अण्णासाहेब काळे, कार्यकारी अभियंता, महावितरण.