ठाणे : डोंबिवली येथे एमडी हे अमली पदार्थ विक्री करणाऱ्या प्रवीण चौधरी उर्फ एमडी किंग (५४) याला त्याच्या साथिदारांसह ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २१ लाख ३० हजार रुपये किमतीचे एमडी हे अमली पदार्थ जप्त केले आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो एमडी पावडर रिक्षामधून विक्री करत असे. त्यांनी हे अमली पदार्थ कोठून आणले याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा : ठाकरे यांची शिवसेना ठाणेकरांना विचारत आहे ‘काय आहे हिंदुत्व ?’, लोकन्यायालयात मत जाणून घेण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवली येथील कुंभारखान पाडा येथे प्रवीण चव्हाण (४२) याला मार्चमध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडे १४ लाख ३० हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्याने हे अमली पदार्थ कोठून विकत घेतले. याबाबत चौकशी केली असता, प्रवीण चौधरी याचे नाव समोर आले. प्रवीण चौधरी हा स्वत:ला एमडी किंग म्हणवून घेत असे. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून प्रवीण चौधरी, विनोद पटवा (३१) आणि व्यंकटा नरसिम्हा देवरा (३५) यांना ताब्यात घेतले. प्रवीण याची झडती घेतली असता, त्याच्याकडून सात लाख रुपयांचे एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. प्रवीण हा अमली पदार्थ विक्रीसाठी रिक्षाचा वापर करत होता. हे अमली पदार्थ तो रात्रीच्या वेळेत विक्री करत असे. तसेच प्रत्येक अर्ध्या तासाने तो ठिकाण बदलत असे. त्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण जात होते. प्रवीण चौधरी याला यापूर्वी देखील पोलिसांनी अटक केली होती. जामीनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा डोंबिवली शहरात एमडी आणि गांजा विक्री करण्यास सुरूवात केली होती अशी माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.