डोंबिवली: डोंंबिवली शहराच्या एमआयडीसी आणि मध्यवर्ति भागात बाहेरून झगमगीतपणा केलेली मसाज केंद्र चालवली जात आहेत. या मसाज केंद्रांमध्ये महिला, पुरूषांच्या आरोग्याच्या तक्रारी आणि त्याप्रमाणे मसाज केला जातो, असे वातावरण या केंद्रांकडून बाहेर निर्माण केले जाते. प्रत्यक्षात या केंद्रांमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात आहे, अशी तक्रार डोंबिवलीतील मुंबई उच्च न्यायालयातील एक वकील ॲड. मंगेश कुसुरकर यांनी वरिष्ठ आणि स्थानिक पोलीस अधिकऱ्यांकडे केली आहे.

या मसाज केंद्रांमध्ये काही गरीब, गरजू, पीडित महिलांना नोकरी, पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी आणले जाते. या केंद्रांमुळे काही चांगल्या घरातील मंडळी बळी पडत असल्याने ती कुटुंब अस्वस्थ आहेत. मसाज केंद्रांमुळे काही घरांमध्ये दररोज भांडणे होत आहेत. कल्याणमधील खडकपाडा भागात तीन महिन्यापूर्वी पोलिसांनी एका व्यापारी संकुलातील इमारतीत सुरू असलेल्या मसाज केंद्रात छापा मारून तेथून काही महिला, पुरूष ग्राहकांना अश्लिल प्रकार करताना पकडले होते.

याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.डोंबिवली सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराच्या मध्यवर्ति ठिकाणी मसाज केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेले काही गैरप्रकार शहराला कलंकित करत आहेत. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी आपल्या भागात सुरू असलेल्या मसाज केंद्रांची अचानक पाहणी करावी. तेथे काही गैरप्रकार सुरू असतील तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी ॲड. मंगेश कुसुरकर यांनी पोलिसांना केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ॲड. कुसुरकर यासंदर्भात लवकर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांचीही भेट घेणार आहेत. उपायुक्त झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली शहरे नशामुक्त करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय शहरातील गु्न्हेगारी कमी करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुंडांची दहशत कमी झाली आहे. अशा परिस्थितीत आता ही मसाज केंद्रे शहराची डोकेदुखी ठरू लागल्याने पोलिसांनी या मसाज केंद्रांकडे आपला मोर्चा वळवावा, अशी मागणी ॲड. कुसुरकर यांनी केली आहे.