डोंबिवली – आपण खासगी कंपनीत गुंतवणूक केल्यास आपणास चांगला परतावा मिळेल, असे बिहारमधील एका महिलेने डोंबिवलीतील एका ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन माध्यमातून सांगितले. ज्येष्ठ नागरिकाने या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन महिलेच्या सल्ल्याप्रमाणे १३ लाख ५० हजार रूपये कंपनी योजनेत गुंतवणूक केली. त्यानंतर महिलेने आकर्षक परतावा नाहीच पण मूळ रक्कमही ज्येष्ठ नागरिकाला परत न करता फसवणूक केली आहे.

या फसवणूक प्रकरणी डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर भागात राहणारे सुरेश जयस्वाल (७४) यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल केली. नोव्हेंबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या आर्थिक फसवणूक प्रकरणी तक्रारदार जयस्वाल यांनी तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात केला होता. या अर्जावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. अनुकुमारी बाळकृष्ण पांडे असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. त्या बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील चंदोती मोर गावात राहतात, असे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणात अद्याप कोणालाअटक करण्यात आलेली नाही.

सुरेश जयस्वाल यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की ऑनलाईन माध्यमातून अनुकुमारी पांडे यांनी आपल्याशी संपर्क साधला. आपला विश्वास संपादन केला. आपणास आयआयएफएल या कंपनीत गुंतवणूक केली तर कमी कालावधीत चांगला आकर्षक परतावा मिळेल असे सांगितले. चांगली गुंतवणूक योजना असल्याने आपण नोव्हेंबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत अनुकुमारी पांडे यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आरटीजीएस व ऑनलाईन माध्यमातून आपल्या बँक खात्यामधून पांडे यांच्या महिंद्रा कोटक बँक खात्यात टप्प्याने १३ लाख ५० हजार रूपयांची रक्कम भरणा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठराविक कालावधी नंतर गुंतवणूक रकमेवर आकर्षक परतावा मिळणे गरजेचे होते. त्याची मागणी जयस्वाल यांनी महिलेकडे सुरू केली आहे. पांडे यांनी विविध कारणे देऊन वेळकाढूपणा सुरू केला. त्यानंतर त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. पांडे यांच्याकडे गुंतवणूक करून दोन वर्ष उलटली तरी आपणास वाढीव परतावा नाहीच, पण आपली मूळ रक्कमही त्या परत करत नसल्याने त्यांनी आपली रक्कम स्वार्थासाठी वापरली आणि आपली आर्थिक फसवणूक केली म्हणून सुरेश जयस्वाल यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक देवरे तपास करत आहेत.