डोंबिवली – डोंबिवली शहराच्या विविध भागातील शिंदे शिवसेना आणि काँग्रेसमधील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्या उपस्थितीत गुरूवारी ठाकरे गटात प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाने शहराच्या विविध भागात कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी करण्यासाठी हे पक्ष प्रवेश करून घेतले आहेत.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या कार्यशैलीने प्रभावीत होऊन आपण ठाकरे गटात प्रवेश करत आहोत, असे या पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले. शिंदे गटाचे कल्याण डोंबिवलीचे वाहतूक सेना अध्यक्ष प्रवीण साळवी, ग्राहक संरक्षण कक्ष उप शहर संघटक कैलास सणस, काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभाग प्रदेश सचिव शिबू शेख यांच्यासह सुमारे दोनशे कार्यकर्त्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
या पक्ष प्रवेशामुळे डोंबिवलीतील ठाकरे गट शिवसेनेची ताकद वाढली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हे पक्षप्रवेश खूप महत्वाचे ठरणार आहेत. अशाप्रकारे पक्ष वाढीसाठी अधिकाधिक प्रयत्न केले जाणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते ठाकरे गटात आल्याने डोंबिवलीतील जनतेचा विश्वास हा ठाकरे कुटुंबीयांवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही लाट भविष्यात आणखी प्रबळ होणार आहे, असे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांनी आता नागरिकांच्या विविध प्रकारच्या तक्रारी, नागरी समस्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दीपेश म्हात्रे यांनी केले. या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, डोंबिवली शहर सचिव सुरेश परदेशी, श्याम चौगुले, चेतन म्हात्रे, महिला आघाडी प्रमुख सुप्रिया चव्हाण, प्रियांका विचारे, युवा सेनेचे शहर प्रमुख आदित्य पाटील, युवती सेनेच्या प्रमुख रिचा कामतेकर, ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण प्रमुख राहुल भगत, महिला आघाडीच्या महिला पदाधिकारी अधिक संख्येने उपस्थित होते. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटाचा मशाल असलेला झेंडा आणि दुपट्टा देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी या पक्षप्रवेशासाठी मागील दोन महिन्यांपासून मेहनत घेतली होती. पक्षाची स्थानिक पातळीवर ताकद वाढली पाहिजे. शहराच्या विविध भागात कार्यकर्त्यांचे एक संघटन उभे राहिले पाहिजे. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी एक तगडी फळी पक्षात असावी हाही या पक्षप्रवेशा मागील मुख्य उद्देश आहे, असे शहरप्रमुख तेलगोटे यांनी सांगितले.