डोंबिवली – डोंबिवली पूर्व स. वा. जोशी शाळेजवळील वाहतूक कोंडीला पूर्ण विराम देणारा आणि जोशी शाळेकडून ठाकुर्ली रेल्वे फाटकावरून थेट ९० फुटी रस्त्याला म्हसोबा चौक येथे जोडणारा उड्डाण पूल ठाकुर्ली रेल्वे फाटकाजवळ मागील आठ वर्षापासून रखडला आहे. या महत्वपूर्ण पुलाचे काम मार्गी लागावे म्हणून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाकडून कार्यवाही केली जात नाही. पूल उभारणी करणारी एमएमआरडीएही यासंदर्भात उदासीन असल्याने सोमवारी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने एकत्रितपणे रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाण पूल भागात आंदोलन केले.
हा पूल पूर्ण होत नसल्याने प्रवाशांना सारस्वत कॉलनी, पेंडसेनगर भागातून ठाकुर्ली चोळे गावातील हनुमान मंदिरावरील अरूंद रस्त्याने ९० फुटी रस्ता भागात जावे लागते. हा वळसा कमी करण्यासाठी आठ वर्षापूर्वी पालिकेने एमएमआरडीएच्या सहकार्याने जोशी शाळा, नेहरू रस्त्यावरील जलाराम मंदिर ते ठाकुर्ली रेल्वे फाटक, संतवाडी, म्हसोबानगर झोपडपट्टी ते ९० फुटी रस्त्यावरील म्हसोबा चौक दरम्यान उड्डाण पूल उभारणीचे काम सुरू केले होते. हा प्रस्ताव दहा वर्षापूर्वीच पालिका महासभेने मंजूर केला आहे.
एमएमआरडीएच्या निधीतून हे काम सुरू आहे. या पुलामुळे डोंबिवली पश्चिमेतून, डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाकडून येणारी वाहने ठाकुर्ली चोळेगावात न जाता थेट उड्डाण पुलावरून म्हसोबा चौक भागात जाणार आहेत. जोशी शाळा ते ठाकुर्ली रेल्वे फाटक असे सुमारे दीडशे ते दोनशे मीटरचे पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तरीही या पुलाचे काम पालिका, एमएमआरडीए मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. यापूर्वी या पुलासाठी निधी नसल्याचे कारण पालिकेकडून दिले जात होते. विकास पुरूष या विषयांवर एक शब्दही बोलत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
या रखडलेल्या उड्डाण पुलाचे काम सुरू करून ते लवकर पूर्ण करावे या मागणीसाठी सोमवारी मनसेचे जिल्हाप्रमुख प्रकाश भोईर, ठाकरे गटाचे शिवसेना शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेविका सरोज भोईर, कोमल पाटील, रमा म्हात्रे आणि इतर शिवसेना, मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रखडलेल्या ठाकुर्ली पुलावर आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा देत पुलावरून कागदी विमाने सोडण्यात आली.
या पुलाच्या विषयावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या पुलाचे काम लवकर सुरू केले नाही तर लवकरच या पुलाच्या कामासाठी बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा मनसे, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक हा आठ वर्षापासून रखडलेला महत्वपूर्ण पूल मार्गी लागला तर ठाकुर्ली चोळेमधील वाहन कोंडी कमी होईल. प्रवासी थेट कल्याण, डोंबिवली प्रवास करतील. वाहतुकीसाठीच्या या महत्वाच्या रखडलेल्या पुलाच्या विषयावर प्रशासन उदासीन असल्याने आंदोलन करण्यात आले. – प्रकाश भोईर जिल्हाप्रमुख, मनसे, डोंबिवली.