डोंबिवली – उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता डोंबिवलीतील ठाकरे गटाचे बहुतांशी पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दीपेश म्हात्रे यांनी सुरूवात केली आहे. ठाकरे गटाचे म्होरके भाजपमध्ये दाखल झाल्याने ठाकरे गटाला डोंबिवलीत खिंडार पडले आहे. ठाकरे गटाबरोबर मनसेचे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
मनसेचे डोंबिवलीतील काही माजी ज्येष्ठ नगरसेवक शिंदे गटाच्या मार्गावर होते. पण त्यांची गणिते बिघडल्याने त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश झाला नसल्याची ठाणे, मुंबईत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे या नगरसेवकांनी भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. आपल्या स्थानिक नेत्याच्या इशाऱ्यावरून ही मंडळी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा शहरात आहे.
मागील लोकसभा निवडणुकीच्यावेळी कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजू पाटील यांना विजयासाठी साथ देण्याचे छातीठोक आश्वासन शिंदे शिवसेनेकडून देण्यात आले होते. पण ते आश्वासन पाळले नाहीच, उलट शिंदे शिवसेनेने राजू पाटील यांच्या विरूध्द आपल्या विश्वासातील राजेश मोरे यांना उमेदवारी देऊन राजू पाटील यांचा पराभव केला. हा पराभव मनसेचे नेते राजू पाटील यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आत्ताच चांगली संधी चालून आली आहे असा विचार करून मनसेतील पदाधिकारी आपल्या वरिष्ठांच्या भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.
पालिका निवडणुकीनंतर महापौर पदाची माळ गळ्यात पडण्याची चिन्हे असल्याने भाजपचे दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवलीत भाजपचे नगरसेवकांचे संख्याबळ वाढावे यासाठी मनसे, ठाकरे गटासह इतर पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या साथीने प्रयत्न सुरू केले आहेत.
भाजपमध्ये प्रवेश
मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात गुरूवारी झालेल्या कार्यक्रमात डोंबिवलीतील ठाकरे गटाचे शहरप्रमुख ओमनाथ नाटेकर, शाखा प्रमुख सचिन कुर्लेकर, शहर संघटक हरिश्चंद्र पराडकर, मनसेचे विद्यार्थी सेना अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, विभागप्रमुख गणेश यादव, शाखा अध्यक्ष समीर पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
येत्या दोन दिवसात मनसेचे डोंबिवलीतील काही ज्येष्ठ नगरसेवक, काही सामाजिक कार्यकर्ते आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, प्रदेश नेते शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक संतोष केणे, माजी नगरसेवक मंदार हळबे, पप्पू म्हात्रे उपस्थित होते.
