डोंबिवली – पैशाच्या वादातून आणि त्यानंतर झालेल्या पोलीस ठाण्यातील तक्रारीवरून बुधवारी रात्री उमेशनगर परिसरातील तरूणांच्या दोन गटात जोरदार राडा झाला. यावेळी एका तरूणाला बेदम मारहाण करून त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच बाजुला असलेल्या त्याच्या वाहनाची काच फोडून वाहनाचे नुकसान करण्यात आले.

याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात सुजल शरद म्हात्रे (२२) या तरूणाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सुजल हा डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर मधील जया शांताराम हाईट्स इमारतीत राहतो. सुजल म्हात्रे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी रोमेश रतन म्हात्रे, रोचित रतन म्हात्रे आणि रोहण रतन म्हात्रे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. हा हाणामारीचा प्रकार डोंबिवली उमेशनगर परिसरातील गावदेवी मंदिरामागील सुजल म्हात्रे याच्या शांताराम आर्केड कार्यालयाच्या बाजुला घडला आहे.

पोलीस ठाण्यातील माहिती अशी की सुजल म्हात्रे आणि रोमेश आणि रोचित म्हात्रे यांच्यात यापूर्वी काही पैशाचा व्यवहार झाला होता. या पैशाच्या व्यवहारावरून रोमेश याने सुजल म्हात्रे याला वेळोवेळी शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. रोमेशकडून होणाऱ्या या सततच्या त्रासाला कंटाळून सुजल म्हात्रे याने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यामुळे रोमेश म्हात्रे आणिखी संतप्त झाला होता. आपल्यातील हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत का नेले. पोलीस ठाण्यात तू तक्रार का केली असे प्रश्न रोमेश सुजल यास करत होता. रोमेश या तक्रार प्रकरणावरून संतप्त झाला होता.

बुधवारी रात्री रोमेश याने सुजल याला मोबाईलवर संपर्क केला. त्यानंतर पुन्हा रोमश, रोचित यांनी पैशाचा विषय सुजल याच्या बरोबर काढला. या विषयावरून त्यांच्यात पु्न्हा वाद झाला. सुजल याच्या गावदेवी मंदिरा मागील कार्यालयाच्या बाहेर सुजल आणि रोमेश, रोचित यांच्या वादावादी झाली. रोमेश आणि रोचित यांनी सुजल याला शिवीगाळ करत हाताच्या बुक्क्याने मारहाण केली. आणि सुजलला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी झालेल्या हाणामारीत सुजल याची कार्यालयाबाहेरील वाहनाची काच रोमश आणि रोचित यांनी फोडली. बाजुला असलेल्या रोहण याने वाईट शब्दात शिवीगाळ करून जमिनीवर पडलेला दगड उचलून सुजलच्या दिशेने मारून त्याला दुखापत केली.

पोलीस उपनिरीक्षक कुमटकर याप्रकरणाचा तपास करत आहेत. अशाच प्रकारे डोंबिवली पश्चिमेतील एका पक्षीय कार्यालयात काही दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेत जोरदार राडा झाल्याची जोरदार चर्चा आहे. यामध्ये एका ज्येष्ठ कार्यकर्त्यालाही मारहाण झाल्याची चर्चा आहे.