डोंबिवली – डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानका जवळील महात्मा गांधी या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर रस्त्याच्या मध्यभागी वाहतुकीला अडथळा, नागरिकांच्या जीविताला धोका होईल अशा पध्दतीने रिक्षा उभी करणाऱ्या डोंबिवली पश्चिमेतील दोन रिक्षा चालकांच्या विरुध्द विष्णुनगर पोलिसांनी फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
ऋतिक सुरेश वाकोडे (२१), अविनाश दिलीप भालेराव (२२) अशी गुन्हा दाखल रिक्षा चालकांची नावे आहेत. ऋतिक हा जुनी डोंबिवलीमधील नेमाडे गल्ली भागात राहतो. तर अविनाश हा उमेशनगरमध्ये राहतो. डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागातील महात्मा गांधी रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, पंडित दिनदयाळ रस्ता, महात्मा फुले रस्ता हे सर्वाधिक वाहन वर्दळीचे रस्ते आहेत. नागरिकांची वर्दळ या रस्त्यावर असते. डोंबिवली रेल्वे स्थानकात जाणारा येणारा प्रवासी या रस्त्यावरून प्रवास करतो.
रिक्षा वाहनतळावर उभे न राहता अनेक नवतरूण रिक्षा चालक झटपट प्रवासी मिळतील आणि अधिकच्या प्रवासी फेऱ्या मारता येतील असा विचार करून डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारावर रिक्षा उभी करून तेथून प्रवासी मिळविण्याचा प्रयत्न करतात. यामुळे महात्मा गांधी रस्त्यावर पु. भा. भावे सभागृहाकडून येणाऱ्या वाहनांना या रेल्वे प्रवेशद्वारात उभ्या केलेल्या वाहनांमुळे अडथळा येतो. या रिक्षा चालकांनी रेल्वे प्रवेशव्दार अडवून उभे राहू नये म्हणून वाहतूक पोलीस सतत त्यांच्यावर पाळत ठेऊन असतात. पण वाहतूक पोलीस तेथून निघून गेले की पुन्हा काही बेशिस्त रिक्षा चालक पुन्हा रेल्वे प्रवेशव्दारात रस्त्यावर रिक्षा उभी करून झटपट प्रवासी मिळविण्याचा प्रयत्न करतात.
दोन दिवसापूर्वी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोळंके, हवालदार थोरात, विसपुते, थोरात, श्रीराम मिसाळ डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एव्हरेस्ट हाॅलसमोरील रसरंजन हाॅटेल समोरील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर ऋतिक वाकोडे आणि अविनाश भालेराव हे रस्ता अडवून रिक्षा उभी करून उभे असल्याचे दिसले. या दोन्ही रिक्षांमुळे रस्त्यावरील वाहनांना अडथळा येत होता. हे दिसत असुनही वाकोडे, भालेराव आपली रिक्षा बाजुला घेत नव्हते.
हा प्रकार विष्णुनगर पोलीस ठाण्याचे गस्ती पथक साहाय्यक उपनिरीक्षक सोळंके यांच्या निदर्शनास आला. त्यांनी या दोन्ही रिक्षा चालकांना बाजुला घेतले. अशाप्रकारे रस्त्यावर रिक्षा उभी करून तुम्ही वाहतुकीला अडथळा आणि वेगात असलेल्या वाहनामधील प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करत आहात असे सांगितले.
या दोन्ही रिक्षा चालकांना समज देऊन हवालदार श्रीराम मिसाळ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिक्षा चालक ऋतिक वाकोडे, अविनाश भालेराव यांच्या भारतीय न्याय संहितेप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल केले. पोलिसांनी ही नियमित कारवाई सुरू ठेवावी, अशी रिक्षा चालक मालक संघटनेची मागणी आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रिक्षा चालकांवर नजर ठेवण्यासाठी रेल्वे स्थानक भागातील पालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे सरू करण्याची मागणी रिक्षा चालक मालक संघटनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे.