डोंबिवली: डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यावर स्टेट बँकेच्या शाखेसमोर एका पादचाऱ्याला दोन जण बेदम मारहाण करत त्याच्याजवळील रक्कम लुटत असल्याचे दिसताच, दोन पादचारी तरूण मारहाण होत असलेल्या वाचविण्यासाठी मध्ये पडले. यावेळी दोन्ही लुटारू तरूणांनी मध्ये पडलेल्या दोन्ही तरूणांना चाकुचा धाक दाखवत त्यांना मारण्याची धमकी दिली.
रामनगर पोलिसांनी याप्रकरणाची माहिती मिळताच दोन्ही तरूणांना अटक केली आहे. तेजस राजु देवरूखकर (२०, रा. ओशियन प्राईड, सोनारपाडा), सुजित विजय थोरात (२०, आरो पार्क, सोनारपाडा) अशी अटक करण्यात आलेल्या लुटारू तरूणांची नावे आहेत. डोंबिवलीतील सावरकर रोड भागात राहणारे राहुल शंकर चौरासिया यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही लुटारूंविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली पूर्वेतील सावरकर रस्त्यावरून शनिवारी रात्री राहुल चौरासिया हे पायी घरी चालले होते. त्यावेळी स्टेट बँकेच्या समोरील भागात दोन तरूण एका नागरिकाला चाकुचा धाक दाखवत त्याला मारण्याची धमकी देत त्याच्याजवळील रोख रक्कम जबरदस्तीने लुटत असल्याचे दिसले.
लुट होत असलेली व्यक्ति मदतीसाठी ओरडा करत होती. त्यावेळी राहुल चौरासिया आणि त्यांचा मित्र राघव हे सदर इसमाच्या मदतीसाठी धावले. त्यावेळी दोन्ही तरूणांनी राहुल यांनाही मध्ये का पडतो म्हणून चाकुचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील दोन हजार रूपयांची रक्कम जबरदस्तीने काढुन घेतली. अन्य एका नागरिकाच्या खिशातील दोन हजार रूपये जबरदस्तीने काढुन घेतले.
या दोन्ही तरूणांनी टिळक रस्त्यावर माजवलेली दहशत आणि त्यामुळे या भागातून भयभयीत होऊन जाणारे पादचारी पाहून या भागातून दुचाकीने चाललेल्या पत्रकार प्रदीप भणगे यांच्या हा लुटीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने रामनगर पोलिसांना ही माहिती दिली. तातडीने रामनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही तरुणांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना अटक केली.
या दोन्ही लुटारू तरूणांविरुध्द यापूर्वी गु्न्हे दाखल आहेत. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही तरूणांनी टिळक रस्त्यावर चाकुचा धाक दाखवत पादचाऱ्यांना लुटले आहे. त्यांची चौकशी सुरू केली आहे. त्यांनी अन्य काही प्रकार केले आहेत का याचाही तपास केला जात आहे. – सुहास हेमाडे,साहाय्यक पोलीस आयुक्त, डोंंबिवली.