कल्याण : टिटवाळा-कल्याण-डोंबिवली ते शिळफाटा दरम्यानच्या ३० किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण रस्ते मार्गात अडथळा ठरणारी १२५ बांधकामे कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागाच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाने शुक्रवारी जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे मागील काही वर्षापासून अटाळी भागात रखडलेला बाह्यवळण रस्ते मार्गाचा टप्पा बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत टिटवाळा-आंबिवली अटाळी-गांधारे पूल-वाडेघर ते दुर्गाडी किल्ला-पत्रीपूल ते मोठागाव-कोपर-भोपर ते शिळफाटा- काटई-हेदुटणे असा ३० किलोमीटर लांबीचा कल्याण-डोंबिवली शहराबाहेरून जाणारा बाह्यवळण रस्ता उभारणीचे काम सुरू आहे. या रस्त्यामधील टिटवाळा ते वाडेघरपर्यंतचे रस्ते बांधणीचे टप्पे पूर्ण झाले आहेत. या टप्प्यामधील अटाळी भागात वळण रस्त्याच्या मार्गात १२५ चाळ, झोपड्यांची बांधकामे होती.

हेही वाचा : बेदरकार ट्रकने चिरडल्याने एकाचा मृत्यू; बदलापूर येथील घटना, चालक ताब्यात

या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न काही वर्षापासून रखडला होता. हा प्रश्न आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या पुढाकाराने मार्गी लागला. त्यामुळे आयुक्त डाॅ. जाखड यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी अतिक्रमण नियंत्रण, फेरीवाला हटाव पथक, जेसीबी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दिवसभरात अटाळी भागातील वळण रस्ते कामाला अडथळा ठरणारी १२५ बांधकामे जमीनदोस्त केली.

वळण रस्ते मार्गात अटाळी येथे बांधकामे असल्याने एमएमआरडीएला त्या भागात रस्ता बांधणीचे काम करता येत नव्हते. पालिकेने रस्त्यासाठी जमिनीचे संपादन करून ती जमीन एमएमआरडीएला रस्ते कामासाठी हस्तांतरित करायची आहे. जमीन भूसंपादन आणि हस्तांतरणाचे काम पालिकेकडून केले जात नसल्याने अटाळीतील काम अनेक वर्ष रखडले होते.

या वळण रस्ते कामातील दुर्गाडी किल्ला-पत्रीपूल ते ठाकुर्ली-खंबाळपाडा (खाडी किनारा भाग), डोंबिवलीतील गणेशनगर, राजूनगर, देवीचापाडा ते मोठागाव माणकोली पुलापर्यंतच्या वळण रस्ते मार्गाचे काम एमएमआरडीएने सुरू केले आहे. या कामासाठीची बहुतांशी जमीन पालिकेने एमएमआरडीएला हस्तांतरित केली आहे. या कामासाठी सुमारे ३५१ कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

हेही वाचा : कासारवडवली उड्डाणपुलाच्या कामामुळे कोंडीचा ताप

मोठागाव माणकोली ते पत्रीपूल टप्पा पूर्ण झाल्यानंंतर माणकोली पुलावरून वाहनाने प्रवाशांना डोंबिवलीत न येता शहराबाहेरून कल्याण दिशेने जाता येणार आहे. कल्याणमधील प्रवाशांना याच रस्त्याने माणकोली पुलावरून ठाणे, मुंबईत जाता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अटाळी येथील काही भागात वळण रस्ते मार्गात १२५ बांधकामे बाधित होती. या बांधकामातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या पुढाकाराने मार्गी लागला. आयुक्तांच्या आदेशावरून या महत्वपूर्ण वळण रस्ता टप्प्यातील १२५ बांधकामे तोडण्यात आली.

संदीप रोकडे (साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग, टिटवाळा)