कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या अनेक वर्षापूर्वीं कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजुला बांधलेल्या श्वान निर्बिजीकरण केंद्राची पडझड झाली आहे. भिंतींना चिरा, फरशा उखडल्या आहेत. श्वानांच्या पिंजऱ्यांना गंज लागला आहे. या सगळ्या बजबजपुरीच्या वातावरणात पालिकेचे श्वान केंद्र चालविले जात आहे. या केंद्रामध्ये निर्बिजीकरणासाठी आणलेल्या श्वानांचे या सगळ्या बिकट परिस्थितीमुळे हाल होत आहे, अशा तक्रारी प्राणीप्रेमी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

मुसळधार पावसामुळे या निर्बिजीकरण केंद्राच्या बाजुला नाल्या लगतची संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून येत असलेले नाल्याचे पाणी थेट निर्बिजीकरण केंद्रात शिरत होते. यावेळी निर्बिजीकरण केंद्रातील श्वानांच्या बचावासाठी या केंद्रातील कर्मचारी, सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पळापळ होत होती. गेल्या महिन्यात आलेल्या पुरामुळे श्वानांना वाचविण्यासाठी पिंजरे उंचीवर आणि एकमेकांवर ठेवण्यात आले. अन्यथा पुराच्या पाण्यात श्वान पिंजऱ्यासह वाहून जाण्याची भीती होती, असे प्राणीप्रेमींनी सांगितले.

पालिकेचा तीन हजार रूपये कोटीचा अर्थसंकल्प असताना आणि पालिका कल्याण बाजार समिती लगतच्या आणि सर्वोदय माॅल समोरील या निर्बिजीकरणातील श्वानांवर दरवर्षी सुमारे दीड कोटी खर्च करते. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत या निर्बिजीकरण केंद्रातील श्वानांवर पालिकेच्या आरोग्य विभागाने सुमारे चार कोटी खर्च केले आहेत. एवढया कोटीच्या रकमा पालिका निर्बिजीकरण केंद्रावर खर्च करत असताना पालिका निर्बिजीकरण केंद्राची पडझड झालेली इमारत का दुरूस्त करत नाही, असे प्रश्न प्राणीप्रेमी करत आहेत.

या निर्बिजीकरण केंद्राच्या माध्यमातून कधीही शहरातील भटके श्वान पकडण्याची कार्यवाही केली जात नाही, अशा तक्रारी आहेत. या केंद्रात श्वान पकडण्यासाठी एकच वाहन असल्याचे समजते. भटक्या श्वानांचे केंद्रात खाण्याचे हाल असतात. निर्बिजीकरण केलेल्या श्वानाला विहित दिवसात त्याच्या हद्दीत सोडावे लागते. पण त्याच्यामुळे इतर भटक्या श्वानांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जात नाही. निर्बिजीकरण केंद्रात कागदोपत्री फक्त डाॅक्टर नियुक्त असल्याचे, या केंद्रात अधिक संख्येने भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण केल्या जात असल्याची माहिती माहिती अधिकारातून दिली जात असली तरी प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आहे. फक्त या निर्बिजीकरण केंद्राच्या माध्यमातून आरोग्य विभागातील कर्मचारी लाखो रूपयांची देयक वित्त विभागाकडून मंजूर करून घेतात. त्यामुळे पालिकेचे निर्बिजीकरण केंद्र हे दौलतजादा करण्याचे केंद्र झाले आहे. या केंद्रात श्वानांची सेवा कमी आणि खाऊगिरी अधिक असे चित्र आहे. या केंद्रातील या सर्व हालचालींची तक्रार आपण आयुक्तांकडे केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींंवर कठोर कारवाई करण्याची मागणी आपण आयुक्तांकडे करणार आहोत, असे माहिती कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी सांगितले.

पत्रीपुलाजवळील निर्बिजीकरण केंद्र असलेली वास्तु खूप जुनी आहे. या केंद्राच्या दुरुस्तीसंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कोरे यांना प्रस्ताव दिला आहे. श्वानांचे पिंजरे खराब झाले आहेत. यासंदर्भात वरिष्ठांना कळविले आहे. भटके श्वान पकडण्याची कारवाई नियमित असते. पण भौगोलिक क्षेत्र मोठे असल्याने काही अडचणी येतात. -कमलेश सोनावणे, नियंत्रक अधिकारी, श्वान निर्बिजीकरण केंद्र.