कल्याण : ठाणे, नवी मुंबई, मुंबई, कल्याण परिसरात घरफोड्या, वाहन चोरी, तसेच पोलिसांवर हल्ला करण्यात पटाईत असलेल्या एका सराईत खतरनाक गुन्हेगाराला खडकपाडा पोलिसांनी बुधवारी आंबिवलीतील अटाळी मधील इराणी वस्ती मधून अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

काही दिवसापूर्वी एका आरोपीला पकडण्यासाठी इराणी वस्तीत असलेल्या मुंबईतील दहिसर पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात या आरोपीचा सक्रिय सहभाग होता. त्याच्यावर ३० गु्न्हे दाखल आहेत. १० गुन्ह्यांमधील तपासासाठी विविध पोलीस ठाण्यांना तो हवा होता. त्याच्या अटकेने अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास साहाय्य होणार आहे, असे खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : उद्घाटनापूर्वीच अभ्यासिकेच्या दुरुस्तीची वेळ

अपे दारा जाफरी उर्फ अफ्रिदी (२४) असे अटक आरोपीचे नाव आहे. अफ्रिदीने मागील काही वर्षात ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात घरफोड्या, चोऱ्या, लुटमारीचे गु्न्हे केले आहेत. वाहने चोरण्यात त्याचा हातखंडा आहे. अनेक गुन्ह्यात तो हवा होता. बुधवारी अफ्रिदी अटाळी भागात येणार असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या भागात गुप्तरितीने सापळा लावला होता. ठरल्या वेळेत अफ्रिदी अटाळीत येताच पोलिसांनी त्याला झडप घालून अटक केली.

हेही वाचा : ठाणे: विनयभंग प्रकरणी शिक्षकाला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद झिने, नंदकुमार केंचे, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, उपनिरीक्षक मधुकर दाभाडे, अशोक पवार, जितेंद्र ठोके, संजय चव्हाण, हवालदार नवनाथ डोंगरे, जितेंद्र सरदार, संजय चव्हाण यांच्यासह १० जणांच्या पथकाने ही अटकेची कारवाई केली.